Jalna Crime News | गुन्हा मागे घेण्यासाठी धमकी दिल्याने १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

December 11, 2024

जालना : Jalna Crime News | गुन्हा मागे घेण्यासाठी धमकी दिल्याने १६ वर्षीय मुलीने राहत्या घरी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. १०) सकाळी ९ वाजताच्या सुमारास अंबड शहरात घडली. भाग्यश्री सुरेश घाडगे (वय १६, रा. अंबड) असे मयत मुलीचे नाव आहे. या प्रकरणात सुरेश घाडगे यांच्या तक्रारीनुसार संशयित सोहम मिंधर, बळीराम मिंधर, दुर्गेश चित्रे व एका महिलेविरुद्ध (सर्व रा.अंबड) भा. न्या. संहिता कलम १०८, ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक वर्षापासून सोहम मिंधर, दुर्गेश चित्रे हे भाग्यश्री हिला तिचे फोटो, व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत होते. त्यामुळे भाग्यश्रीच्या तक्रारीवरून सोहमविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल केलेला तो गुन्हा मागे घ्यावा, यासाठी बळीराम मिंधर व त्यांच्या पत्नीने भाग्यश्री व तिचे वडील सुरेश घाडगे यांना घरी येऊन धमकावले होते. त्यामुळे भाग्यश्रीने मंगळवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याचे सुरेश घाडगे यांनी अंबड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि गुरले करीत आहेत. घटनेनंतर पोनि जाधव, सपोनि गुरले, ठुबे, पोउपनि नरोडे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.