जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – मास्क वापरण्यास सांगितल्याने जळगावमधील फेरीवाल्यांनी महापालिका उपायुक्तांच्या वाहनांवर दगडफेक केली आहे. मंगळवारी (दि. 6) दुपारी ही घटना घडली. शासकीय वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी जळगाव शहरात कडक निर्बंध लागू केले. दरम्यान मंगळवारी शहरातील सुभाष चौक ते बागवान मोहल्ला परीसरात महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली.
मास्क वापरा, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका उपायुक्त संतोष वाहूळे यांनी फेरीवाल्यांना दिला. त्यानंतर ते बागवान मोहल्लाकडे जात असताना काही अज्ञात फेरीवाल्यांनी वाहूळे यांच्या वाहनावर दगडफेक केली. शासकीय वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.