जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – अनेक समाजात अजूनही जात पंचायतीचा पगडा मोठा आहे. या जात पंचायती आपले समाजावरील वर्चस्व टिकविण्यासाठी नेहमीच अघोरी उपाययोजना करीत असल्याचे आढळून आले आहे.
नाथजोगी समाजाच्या जात पंचायतीने एका महिलेला अजब शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी चोपडा पोलिसांनी जातपंचायतीवर गुन्हा दाखल केला आहे.
नाथजोगी समाजातील एका तरुणीने जातीबाहेर लग्न केले. या प्रकाराने चिडलेल्या काही जणांनी जात पंचायतीमध्ये तक्रार केली होती. जात पंचायतीची बैठक नुकतीच भरविण्यात आली होती. त्यांनी जातीबाहेर लग्न केलेल्या या तरुणीला शिक्षा म्हणून चक्क थुंकी चाटण्याची शिक्षा दिली. सर्वांसमोर तिला थुंकी चाटायला लावली. या घटनेनंतर आता या नवविवाहित महिलेने चोपडा पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलिसांनी जात पंचायतीच्या सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे.