जळगाव : बहुजननामा ऑनलाईन – जळगाव शहरात चर्मकार समाज बांधवांची सहविचार सभा संपन्न झाली. सभेत गुरु रविदास व छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती उत्सव दि. १९ फेब्रुवारी २०१९ रोजी साजरा करण्याचे ठरविण्यात आले. यानिमित्त गुरु रविदास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आले.
तसेच आरोग्य शिबिरप्रतिमा पूजन, व्याख्यान, महाप्रसाद (भंडारा) आदी समाजउपयोगी उपक्रम घेण्याचेही सर्वानुमते ठरविण्यात आले. जयंती निमित्त निबंध स्पर्धा मंगळवार दि. १९ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता तर आरोग्य शिबिर संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत तसेच संध्याकाळी ६ ते ८ दरम्यान प्रतिमा पूजनव्याख्यान, प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन संत रोहिदास प्रतिष्ठान हॉल, गट नं१५६/२, जाधव नगर, गिरणा पंपिंग रोड वाघनगर स्टॉप जवळ आयोजित करण्यात आले आहे. आरोग्य शिबिरात रक्तदाब तपासणी, मधुमेह, हृदयरोग, दमा, सांधेदुखी, ्त्रिरयांचे विविध आजारांची विनामूल्य तपासणी व औषधोपचार तज्ञ डॉक्टर संपतराव वानखेडे, डॉ. सुनील सूर्यवंशी, डॉ. सुरेंद्र सुरवाडे, डॉ. दिलीप जयकर, डॉ. उमेश वानखेडे, डॉ. सुनील तायडे, डॉ. जयश्री सूर्यवंशी, डॉ. हर्षला तायडे यांचेमार्फत केली जाणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांना चर्मकार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संत रोहिदास प्रतिष्ठान तथा गुरु रविदास क्लबचे डॉ. सुनील सूर्यवंशी, डॉ. संपतराव वानखेडे, संजय वानखेडे, संजय बाविस्कर, कैलास वाघ, यशवंतराव ठोसरे यांनी केले आहे.