बहुजननामा ऑनलाईन – इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांची माझ्याशी आतापर्यंतच्या आयुष्यात कधीही भेट झाली नाही. सीबीआय मला इंद्राणीसमोर घेऊन गेली होती तेव्हा मी पहिल्यांदाच तिला पाहिले होते. तिच्याशी किंवा तिच्या कंपनीशी माझा कोणताही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नाही. पी. चिदंबरम यांना झालेली अटक ही फक्त माझ्या वडिलांवर झालेली कारवाई नसून काँग्रेसवर घाला घालण्याचा प्रयत्न आहे. कार्ती चिदंबरम यांनी गुरुवारी (ता. २२) माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.
काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केल्यानंतर त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांनी त्यांची बाजू मांडली आहे. त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ते तीन दिवस बेपत्ता होते. मात्र बुधवारी (ता. २१) त्यांनी कॉंग्रेस भवनात पत्रकारांसमोर त्यांची भुमिका मांडली. चिदंबरम यांच्यावर गुरुवारी (ता. २२) सर्वोच्च न्यायलयाचे सरन्यायधीश रंजन गोगाई यांच्या पीठासमोर सुनावणी होणार आहे. सीबीआय त्यांना न्यायालयात हजर करणार आहे.
चिदंबरम यांना अटक झाल्यानंतर कॉंग्रेसमधून संताप व्यक्त केला जात असून सुडाच्या भावनेतून ही कारवाई केली असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. दरम्यान कार्ती चिदंबरम यांनी याचा निषेध करण्यासाठी मी जंतरमंतर मैदानावर जात असल्याचे सांगितले. ईडी आणि सीबीआयकडून चिदंबरम यांच्यावर झालेल्या कारवाईचा काँग्रेसने निषेध केला आहे. त्याचबरोबर याविरोधात निदर्शने करण्यासाठी जंतरमंतरवर अनेक नेते एकत्र आले आहेत.