नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या द्वारका येथे एका ५६ वर्षीय आयआरएस अधिकाऱ्याने आत्महत्या केली असून अधिकाऱ्याचा मृतदेह गाडीत सापडला. अधिकाऱ्याला ताबडतोब दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिवराज सिंह असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
५६ वर्षीय शिवराज सिंह डी.ओ.एम.एस.आर.के पुरममध्ये अतिरिक्त सीआयटी म्हणून तैनात होते. द्वारकामधील समती कुंज अपार्टमेंटमध्ये राहत होते. ते २००६ बॅचचे होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक सुसाइड नोटही सापडली असून त्यात कोरोनाच्या संशयामुळे आत्महत्या केल्याचे म्हटले गेले आहे.
२००६ बॅचचे आयआरएस अधिकारी
शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता दिल्ली पोलिसांना डीडीयू रुग्णालयातून फोन आला की एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांची टीम रुग्णालयात पोहोचल्यानंतर लगेच त्यांना समजले की, मृताचे नाव शिवराज सिंह आहे आणि ते २००६ बॅचचे आयआरएस अधिकारी होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या तपासणीत ऍसिड पिण्यामुळे शिवराज यांचा मृत्यू झाल्याचे समजले, पण पोलिस सध्या पोस्टमार्टम अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.
तपासात समजले की, द्वारका सेक्टर-६ मधील आपल्या अपार्टमेंटच्या बाहेर शिवराज आपल्या कारमध्ये बसले होते आणि तेथेच त्यांनी अॅसिड पिले. परंतु यामागचे कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कोरोना अहवाल होता निगेटिव्ह
सुमारे एक आठवडा आधी शिवराज यांची कोरोना चाचणी झाली होती, जी निगेटिव्ह असल्याचे सांगितले जात आहे. तरीही शिवराज खूप अस्वस्थ होते आणि त्यांना चिंता होती की आपल्याला संसर्ग होऊ नये आणि त्यांच्यामुळे त्यांच्या कुटूंबाला संसर्ग होऊ नये.
मात्र अद्याप पोलिस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे आणि आयआरएस अधिकाऱ्याच्या मृत्यूमागील खरे कारण काय हे पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाल्यानंतरच स्पष्ट होईल.