नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युक्रेन विमान अपघातानंतर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. तो अपघात नसून ते विमान पाडण्यात आल होतं असं काहींनी म्हटलं. या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. इराणच्या लष्कराने हे विमान चुकून पाडलं गेल्याची कबुली दिली आहे. यात 176 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. विमान अपघाताचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे.
युक्रेनचं जे विमान अपघातग्रस्त झालं होतं ते इराणने पाडल्याची गुप्तचर माहिती हाती आली असल्याचे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन थ्रुडू सांगितलं होतं. हे विमान क्षेपणास्त्र हल्ल्यात चुकून पाडलं गेलं होतं. इराणी लष्कराने याची कबुली दिली आहे. तेहरान येथून उड्डाण घेतलेल्या या विमानातील एकूण 176 प्रवाशांपैकी 63 प्रवाशी हे कॅनडाचे नागरिक होते.
Iran state TV, citing military, says country 'unintentionally' shot down Ukrainian jetliner because of human error: The Associated Press pic.twitter.com/HhPUZemVgD
— ANI (@ANI) January 11, 2020
लष्कराच्या वक्तव्यानंतर इराणचे राष्ट्रपती रुहानी म्हणाले, “सशस्त्र दलांच्या अंतर्गत तपासणीनंतर असं समोर आलं आहे की, मानवी चुकीमुळे चुकून युक्रेनचं विमान क्षेपणास्त्राने पाडलं गेलं. यामुळे हा विमान अपघात झाला होता आणि यात 176 लोकांचा मृत्यू झाला होता. या अक्षम्य चुकीचा तपास सुरूच राहिल आणि याला जबाबदार लोकांवर कारवाई केली जाईल.
अपघाताचा व्हिडीओ समोर आल्यानंतर हे विमान पाडल्याचं समोर आलं. याच व्हिडीओच्या आधारे थ्रुडू यांनी आरोप केला होता. याबाबत बोलताना थ्रु़डू म्हणाले होते, “या अपघाताचा आणखी एक व्हिडीओ समोर आला होता. त्यात तेहरानच्या हवाई सुरक्षा बॅटरीजच्या मदतीने हे विमान पाडण्यात आल्याचं दिसून आलं. हा प्रकार कुठल्या हेतूने झालेला नसू शकतो. परंतु कॅनडातील लोकांना काही प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरं मिळाली पाहिजे” असेही ते म्हणाले.
थ्रुडूंच्या आरोपाला पाश्चिमात्य नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले होते की, “इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यातच ते विमान पडले याचे पुरावे आहेत. परंतु त्यांचा हेतू विमान पाडण्याचा नसावा.” दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याबाबत बोलताना म्हणाले होते, “इराणची एक किंवा दोन क्षेपणास्त्रे विमानावर धडकली असावी. यानंतर त्याचा स्फोट झाला असावा.”