मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पुन्हा एकदा कोरोनाने सर्वत्रच थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाचे दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव पाहून सध्या प्रत्येकजण कोरोनापासून बचावासाठी घेता येईल तितकी खबरदारी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. बाहेर पडताना मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचेही पालन करत आहेत. दरम्यान, आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना कोरोना व्हायरस BCCIचं टेंशन वाढवताना दिसत आहे. मंगळवारी वानखेडे स्टेडियमवरील दोन ग्राऊंड्समन आणि एका प्लम्बरसह स्टार वाहिनीच्या १४ क्रू सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा नितीश राणा, दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा देवदत्त पडीक्कल यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यात आता कोरोनानं गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात शिरकाव केला आहे.
मुंबई इंडियन्सचे यष्टिरक्षक सल्लागार व भारताचे माजी यष्टिरक्षक किरण मोरे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मोरे यांच्यात कोणतीही लक्षण दिसत नाहीत आणि ते आयसोलेटेड झाले आहेत. मुंबई इंडियन्स आणि किरण मोरे यांनी बीसीसीआयच्या सर्व नियमांचं पालन केलं आहे. मुंबई इंडियन्सची वैद्यकिय टीम मोरे यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे आणि बीसीसीआयच्या सूचनांचं पालन करत आहे. आम्ही चाहत्यांना हेच सांगतो की कोरोना संदर्भातील नियमांचं पालन करा व स्वतःला सुरक्षित ठेवा. मोरे यांनी ४९ कसोटी सामन्यांत १२८५ धावा, ९४ वन डेत ५६३ धावा केल्या आहेत. त्यांनी कसोटीत ११० व वन डेत ६३ बळी टिपले आहेत.