मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – देशातील कोरोनाबाधितांचा आलेख वाढत चालला आहे. संसर्ग कमी करण्यासाठी कडक निर्बंधांबरोबरच लसीकरणही मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे. दरम्यान, शुक्रवार पासून सुरु होणाऱ्या इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आय़पीएलच्या १४ व्या हंगामावर कोरोना संकट ओढवले आहे. कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करुन आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंपासून ते मैदानावरील कर्मचारी, ब्रॉडकास्टींग टीमधील सदस्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता आयपीएल होणार की नाही अशी उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, गतवर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव आयपीएल सुरु होताना वाढला होता. यंदाही तीच परिस्थती असून देशात दिवसला ७० ते ८० हजार बाधित आढळून येत आहेत.
कोरोनाचा संसर्गापासून कोणीही वाचू शकले नाही
राजकीय नेते, सेलेब्रिटी तसेच क्रीडा क्षेत्रातील अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. लोकप्रिय असलेल्या आयपीएलमधील चार खेळाडूंना एकाच आठवड्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. कोलकाता नाईट नाईड रायडर्समधील सलामीच्या फलंदाजांपैकी एक असणारा नीतीश राणा हा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बाधित आढळून आला होता. मात्र, त्याने कोरोनावर मात करुन पुन्हा मैदानात सरावासाठी हजेरी लावली होती.
आरसीबीचे दोन खेळाडू पॉझिटिव्ह…
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघातील दोन खेळाडू बाधित आढळल्याने मालिका सुरु होण्यापूर्वीच संघाला मोठा फटका बसला. संघाचा सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिक्कल २२ मार्चच्या चाचणी बाधित आढळून आला. मात्र, नुकत्याच घेतलेल्या चाचणीत तो कोरोनामुक्त झाल्याचे समोर आले आहे. तर ७ एप्रिलच्या चाचणी संघातील अष्टपैलू खेळाडू डॅनियल सॅम्सचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं संघ व्यवस्थापनाने सांगितलं आहे. डॅनियलला पहिल्या काही सामन्यांना मुकाव लागणार आहे. तो लवकरच कोरोनावर मात करेल असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
दुसीकडे दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेललाही संसर्ग झाला आहे. संघाच्या कॅम्पमध्ये २८ मार्च रोजी सरावासाठी अक्षर आला होता. त्यावेळी त्याची कोरोना चाचणी केली असता ती निगेटीव्ह आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा चाचणी केली असता तो बाधित आढळून आल्याने त्याला काही सामान्यांना मुकाव लागणार आहे.
मोरेंनाही कोरोनाची लागण
भारतीय क्रिकेट संघाची निवड करणाऱ्या समितीचे प्रमुख राहिलेले माजी क्रिकेटपटू किरण मोरे हे आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या टॅलेंट हंट टीमचे सदस्य आहेत. ६ एप्रिला त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या ते आयसोलेशनमध्ये आहेत. त्याचबरोबर मैदानावरील कर्मचाऱ्यांनाही संसर्ग झाल्याचे आढळले आहे. ब्रॉडकास्टींग टीममधील सदस्य त्याचबरोबर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील मैदानातील ११ कर्मचारी व मुंबईमधून सामन्यांचे लाइव्ह प्रक्षेपण करणाऱ्या टीममधील १४ जण कोरोनाबाधित आढळले आहे.