बहुजननामा ऑनलाईन – आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यंदा दुपारचे सामने ३.३० पासून सुरु होतील. तर सायंकाळचे सामने ७.३० वाजल्यापासून सुरु होतील. पण केंद्र सरकारने अद्यापही त्यासाठी परवानगी दिलेली नाही. दोन ते तीन दिवसामध्ये ही परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
आयपीएल संचालन समितीची व्हर्चुअल बैठक रविवारी रात्री उशिरा संपली. आयपीएलच्या इतिहासात यंदा पहिल्यांदा रविवार ऐवजी आठवड्याच्या मधल्या दिवशी आयपीएलचा अंतिम सामना पाहायला मिळेल. या स्पर्धेत १० डबल हेडर्स सामने असतील. आयपीएलचे आयोजन युएइच्या अबू धाबी, दुबई आणि शारजाहमध्ये आयोजित करण्यात येतील. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युएईमध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे नियम कडक असतील.
खेळाडूंची १४ दिवसात चारवेळा कोविड- १९ चाचणी करण्यात येईल. पहिल्या दोन चाचण्या या युएई मध्ये जाण्यापूर्वी करण्यात येतील त्यानंतर यूएईमध्ये क्वारंटाईन राहिल्यावर कराव्या लागतील. त्यासाठी बीसीसीआय स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) तयार करणार आहे. सर्व खेळाडूंना लवकरच ही नियमावली पाठवण्यात येईल. तसेच आयपीएलचे सर्व सामने स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील. स्टारच्या सर्व चॅनलवर आणि हॉटस्टारवर हा सामना पाहता येईल.