चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाइन – जिल्ह्यात भारिप बहुजन महासंघाची महिला आघाडी मजबूत करण्यासाठी पक्षाने कंबर कसली आहे. राज्यभरात महिलांचे संघटन बळकट करण्यासाठी राज्यपातळीवरून महिला कार्यकारिणीने प्रयत्न सुरू केले असून, २५ जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मुलाखती होणार आहे.
या मुलाखतीनंतर भारिप-बमसंची महिला जिल्हा आघाडी आणि चंद्रपूर महानगर आघाडी गठित करण्यात येणार आहे. यासाठी राज्यनेत्या अंजलीताई आंबेडकर यांच्यासह रेखा ठाकूर, निशा शेंडे, अरुंधती शिरसाठ यांची उपस्थिती राहणार आहे. शासकीय विश्रामगृहात मुलाखती होणार असून, भारिप बमसंच्या महिला कार्यकर्त्यांनी मुलाखतीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारिप-बमसं महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष लता साव यांनी केले आहे.
चंद्रपूर विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीप्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे मुख्य संयोजक ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूर मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. मंगळवारी वंचित बहुजन आघाडीची चंद्रपुरात जाहीर सभा होत असून, स्वत: ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष अससुद्दीन ओवेसी यांची प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.