नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कुवेतहून ८ लाख भारतीय परत येण्याची शंका असताना आता अमेरिकेहूनही भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. सर्व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना घरी परत पाठवण्याच्या योजनेवर अमेरिका विचार करत आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग चालत आहेत, त्यांच्याकडे अमेरिकेत राहण्याचे कोणतेही ठोस कारण नाही. अमेरिकन प्रशासनाने सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांना लवकरात लवकर सर्व अभ्यासक्रम ऑनलाईन सुरू करण्यासही सांगितले आहे.
एका वृत्तसंस्थेनुसार, इमिग्रेशन अँड कस्टम एन्फोर्समेंट डिपार्टमेंटने सोमवारी सांगितले की, एका रिस्क ऑपरेशन अंतर्गत अमेरिका या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची तयारी करत आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने लवकरच काही अभ्यासक्रम ‘ऑनलाईन ओन्ली’मध्ये रुपांतरित केले जाऊ शकतात. अर्थात फक्त इंटरनेटद्वारे शिकवले जाणारे कोर्स. अमेरिकन प्रशासनाच्या या निर्णयामुळे हजारो भारतीय विद्यार्थ्यांवर थेट परिणाम होणार आहे. अमेरिकेत परदेशी विद्यार्थी मोठ्या संख्येने विद्यापीठांमध्ये, प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये आणि नॉन अकॅडमिक-व्होकेशनल प्रोग्राममध्ये शिकत आहेत.
अनेक विद्यापीठांनी सुरु केले कोर्स
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या बऱ्याच मोठ्या विद्यापीठांनी आधीच ऑनलाईन अभ्यासक्रमास सुरवात केली आहे. हार्वर्डनेही आपले सर्व अभ्यासक्रम ऑनलाईन सुरू केले आहेत आणि कॅम्पसमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता वर्गात जाण्याची गरज नाही. असे होताच अमेरिकेसाठी हार्वर्डमध्ये शिकणार्या परदेशी विद्यार्थ्यांना परत पाठवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मेक्सिकोहून हॉवर्ड येथे शिकवणाऱ्या प्रोफेसर वॅलेरिया मेंडोलिया म्हणतात की, विद्यार्थ्यांना सक्तीने परत पाठवले जाऊ शकते, हा अत्यंत त्रासदायक निर्णय आहे. बरेच लोक अशा देशांमधून आले आहेत जेथे त्यांच्या अभ्यासक्रमांनुसार शिक्षणाचे वातावरणच नाही आणि तेथे ऑनलाईन पुरेशी मदत मिळणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
इमिग्रेशन विभागाने जाहीर केले आहे की, काही स्टुडंट व्हिसा असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्ग सुरू झाल्यानंतर अमेरिकेत राहण्याची आवश्यकता नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी अमेरिका प्रत्येक सत्रात व्हिसा देणार नाही आणि त्यांनी घरी परत जावे. सध्या अमेरिकेच्या बर्याच विद्यापीठांमध्ये ऑनलाईन आणि वैयक्तिकरित्या मिक्स कोर्स सुरू आहेत. म्हणजे विद्यार्थ्याकडे अभ्यासाच्या गरजेनुसार ऑनलाईन किंवा कॅम्पसमध्ये जाण्याचा पर्याय आहे.
मात्र अमेरिकन प्रशासन ते पूर्णपणे ऑनलाइनमध्ये बदलण्याचा आग्रह करत आहे. अमेरिकन कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे उपाध्यक्ष ब्रॅड फार्न्सवर्थ यांनी सांगितले की, सरकारचा हा निर्णय त्यांना अत्यंत आश्चर्यकारक वाटला आहे. ते म्हणाले की, या निर्णयामुळे देशातील १८०० विद्यापीठांमधील शैक्षणिक कर्मचारी आणि मुलांसाठी संभ्रमाची परिस्थिती निर्माण होईल. या महाविद्यालये आणि विद्यापीठांनी विद्यार्थ्यांकडून फी घेतली आहे आणि त्यांना काही आश्वासने दिली आहेत, या सर्वांना कोरोना विषाणूच्या बहाण्याने नाकारले जाऊ शकत नाही.