बहुजननामा ऑनलाईन : ( माधवी काकडे) – भारतीय सैनिकांचा त्यांच्या देशसेवेबद्दल आपल्याला नेहमी अभिमान वाटतो . पण देशसेवा करत असतानाच अभ्यास करून आपले स्वप्न पूर्ण करणारे हे खऱ्या अर्थाने तरुणांचे आदर्श बनत असतात. भारतीय सैन्यातून नुकतेच निवृत्त झालेल्या एका सैनिकाने अशीच कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सैन्यातील आपली १८ वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या ४ परीक्षा विठ्ठल काकडे हे माजी सैनिक एकाच वेळी पास झाले आहेत. काकडे हे अहमदनगर जिल्ह्यात असणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील धामणगाव या छोट्याशा खेड्यातील एका शेतकरी कुटुंबातील आहेत.
दरम्यान माजी सैनिक विठ्ठल काकडे यांनी भारतीय सैन्यदलात आपली १८ वर्ष सेवा पुर्ण करून निवृत्तीनंतर ते जामनेर पुरवठा विभागात पुरवठा निरिक्षक म्हणून रुजू झाले अन् त्यांनी एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या ४ परीक्षांमध्ये एकाच वेळी यश संपादन केले आहे. त्यामुळे सध्या या सैनिकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच काकडे यांची काही दिवसातच आपल्या उत्कृष्ट कामगिरीतून कर्तव्यदक्ष पुरवठा अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
अतिशय इमानदारीने काम करून जामनेर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम काकडे करीत असल्याचा अनुभव येथील लोकांना येत आहे आणि त्यातच पहिल्याच प्रयत्नात ४ परीक्षा एकाच वेळी पास होऊन तर ते तरुणांचे आदर्श बनले आहेत. या ४ परीक्षा दिल्यानंतर त्यांचा पुरवठा अधिकारी या परीक्षेचा निकाल अगोदर जाहीर झाला आणि ते लगेच जामनेर येथे पुरवठा अधिकारी म्हणून रुजू झाले.
त्यानंतर त्यांच्या उर्वरित परिक्षेचा निकाल लागला. त्यात देखील त्यांनी चांगले गुण मिळवून यश संपादन केले आहे. काकडे हे वयाच्या १९ व्या वर्षी सैन्यात भरती झाले होते. त्यांनी १८ वर्ष ४ महिने सैन्यात सेवा करून ते निवृत्त झाले. सैन्यातून निवृत्त होताच त्यांनी एमपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेतील सायंटिफीक असिस्टंट,अन्न व नागरी विभागातील पुरवठा निरिक्षक अशा पंधरा दिवसाच्या अंतरात ४ स्पर्धा परिक्षा दिल्या. त्या चारही परिक्षांमध्ये पहिल्याच प्रयत्नात उत्तम यश संपादन करून काकडे यांनी आजच्या तरुणांसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे.
असे एकाच वेळी ४ परीक्षांमध्ये यश मिळविणे ही बाब तरुणांसाठी खरोखरचं प्रेरणादायी आहे. पाथर्डी सारख्या दुष्काळी भागातील एका शेतकऱ्याच्या मुलाने भारतीय सैन्यात आपले कर्तव्य पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा यशाला गवसणी घालून पाथर्डी तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. काकडे यांच्या या संपूर्ण यशाचे श्रेय त्यांनी त्यांचे आई-वडील आणि पत्नी उर्मिला यांना दिले आहे.