मुंबई बहुजननामा ऑनलाईन – आंतरजातीय विवाह केल्याने सामाजिक प्रतिष्ठेपायी नऊ महिन्यांच्या गर्भवती मुलीचा खून करणाऱ्या पित्याची फाशीची शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली आहे. अशा गर्भवती मुलीची हत्या करून दोषी वडीलाने मुलगी आणि वडिल या नात्याचाच खून केला आहे. अशी व्यक्ती समाजासाठी धोकादायक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
नाशिक येथील एकनाथ कुंभारकर याने २०१३ मध्ये आपल्या १८ वर्षाच्या नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या मुलीची हत्या केली होती. नाशिक सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती. राज्य सरकारने या फाशीची शिक्षा कायम ठेवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.
काय म्हणाले न्यायाधीश ?
नऊ महिन्यांच्या गर्भवती मुलीची हत्या करून दोषीने वडिल आणि मुलगी या नात्याचाच खून केला आहे. त्यामुळे अशी व्यक्ती ही समाजासाठी धोकादायक आहे. त्या सगळ्यांचाच विचार करता हे प्रकरण दूर्मिळातील दुर्मिळ प्रकारात मोडते. त्यामुळे आरोपी कठोरातील कठोर अशा फाशीच्या शिक्षेसाठी पात्र आहे. असा निकाल न्यायमुत्री भूषण धर्माधिकारी आणि न्यायमुर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने मंगळवारी दिला आहे.