नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वसामान्यांना वाढत्या महागाईपासून दिलासा मिळण्याची कोणतीही आशा नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींनी जनतची डोकेदुखी वाढविली असताना आता टीव्ही, एसी, फ्रीझ महाग असल्याच्या बातमीने आणखी एक धक्का दिला आहे. त्यात भर म्हणून विमा योजना देखील महाग होणार आहे. आपण विमा पॉलिसी खरेदी करण्याची तयारी करत असल्यास आपल्याला जास्त पैसे द्यावे लागतील. विमा कंपन्या 1 एप्रिलपासून मुदत विमा प्रीमियम महाग करण्याची तयारी करीत आहेत. अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये मुदतीच्या विमा किमतींमध्ये 10-15 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. विमा कंपन्यांनी दर वाढीमागील मुख्य कारण कोरोना महामारी असल्याचे नमूद केले आहे. जागतिक बाजारातही कंपन्या प्रीमियम महागड्या करत आहेत.
जाणून घ्या टर्म प्लॅन म्हणजे काय ?
मानवी जीवनात नैसर्गिक आणि अपघाती कारणांमुळे मृत्यूचा धोका असतो. जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते किंवा अपंग होते, तेव्हा कुटुंबाचे उत्पन्न संपते. कुटुंबासाठी आयुष्य जगणे कठीण होते. आपल्या कुटुंबास अशा परिस्थितीतून वाचवण्यासाठी आपण थेट जीवन विमा पॉलिसी घेऊ शकता. दरम्यान, टर्म प्लॅन लाइफ इन्शुरन्स अंतर्गत कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते. यामध्ये पॉलिसीधारकास योजनेच्या मॅच्युरिटीवर कोणतीही रक्कम मिळणार नाही. टर्म प्लॅन तुम्हाला खूप कमी प्रीमियमवर कव्हर मिळवून देते. साधारणपणे मुदतीच्या योजना 10,15, 20, 25 किंवा 30 वर्षांसाठी घेता येतात.
टर्म पॉलिसीमध्ये विमा कंपनी वेगवेगळ्या व्यक्तीकडून समान वय, कालावधी आणि जीवन कव्हरसाठी वेगवेगळी रक्कम घेऊ शकते. एका वृत्तानुसार एप्रिलपासून खासगी क्षेत्रातील कंपन्या विम्याच्या किंमतीत 10-15 टक्क्यांनी वाढ करू शकतात, कोविडमुळे, जगभरातील मृत्यू दरामुळे री-इंशोरन्सवर परिणाम झाला आहे. कंपन्यांच्या मते, नॉन-मेडिकल रीइन्श्युरन्स प्रीमियममध्ये 25% पर्यंत वाढ झाली आहे. री-इन्श्युरन्स प्रीमियमवरील दबावामुळे कंपन्यांना टर्म प्लॅन प्रीमियम वाढवावा लागू शकतो. विमा कंपन्यांनी केवळ कोरोनाशी संबंधित प्रकरणांमध्ये 1250 कोटी रुपयांचा क्लेम सेटलमेंट केला आहे.
दरम्यान, मुदत विमा प्रीमियममधील या वाढीचा परिणाम पॉलिसी घेणार्या नव्या ग्राहकांवर होईल. म्हणजेच याचा परिणाम जुन्या ग्राहकांवर होणार नाही, कारण जुन्या ग्राहकांसाठी एकदाच ठरवलेला प्रीमियम आयुष्यभर भरावा लागतो. तर येत्या काळात तुम्हाला जर पॉलिसी घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. तर देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) देखील मुदत कव्हरच्या किंमतीत वाढ करेल का? यावर अद्याप स्पष्टपणे कोणतीही माहिती समोर आली नाही.