सांगली : बहुजननामा ऑनलाइन – सांगली जिल्ह्यातील मिरजेतून शासकीय रुग्णसेवेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली. मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या तीन रुग्णांवर उपचार न करता सांगलीत एका निर्जन रस्त्यावर फेकून देण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे . उपचाराअभावी त्यातील एकाचा मृत्यूदेखील झाला आहे. याप्रकरणी रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध शनिवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक अनिल नरसिंगकर व सफाई कर्मचारी सागर साळोखे अशी त्यांची नावे असून नरसिंगकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर रोजी शंकर शिंदे, पीरसाब मोमीन व शिवलिंग कुचनुरे या रुग्णांना उपचार करण्याऐवजी रुग्णालयाबाहेर टाकून दिल्याचा प्रकार उघड झाला. सांगलीतील जुन्या कुपवाड रस्त्यावर अंधारात तीन रुग्ण गंभीर अवस्थेत पडल्याचे नागरिकांना दिसले. त्यानंतर लगेचच संजयनगर पोलिसांना याप्रकरणी माहिती देण्यात आली. तिघांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तातडीने उपचार न मिळाल्याने त्यातील कुचनुरे यांचा मृत्यू झाला. यादरम्यान पोलिसंनी केलेल्या तपासात मिरज शासकीय रुग्णालयातून तिन्ही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात नेत असल्याचे सांगून, सांगलीत निर्जन रस्त्यावर फेकल्याचे निष्पन्न झाले.
रुग्णालय प्रशासनाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर अत्यवस्थ रुग्णांना विनापरवाना बाहेर टाकणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता भोसले यांनी शुक्रवारी रात्री गांधी चौक पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले.