बुलंदशहर : वृत्तसंस्था – मोबाईल फोनचा चार्जर तोंडात घातल्याने वीजेच्या धक्का बसून एका अडीज वर्षाच्या चिमुकलीचा दूर्देवी मृत्यू झाला आहे. उत्तरप्रदेशातील बुलंदशहर येथे ही अतिशय दुःखद घटना घडली आहे. सहवर असं या चिमुकलीच नाव आहे. घरात चार्जिंगसाठी लावलेला मोबाईल फोन चार्ज झाल्यानंतर तो काढला. मात्र, चार्जरचं बंद करण्याचे विसरल्याने हा प्रकार घडल्याची माहिती समोर येतेय.
इफ्तारीसाठी लहानग्या सहवरला घेऊन तिची आई रझिया जहांगिराबादला माहेरी आली होती. शनिवारी घरातील कुणीतरी आपला मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जरला लावला होता. काही वेळाने त्या व्यक्तीने मोबाईल चार्जरमधून काढला. मात्र, चार्जर तसाच ठेवून ती व्यक्ती स्विच ऑफ करायचेही विसरून गेली. खेळता खेळता सहवरने चार्जरच्या वायरचे टोक तोंडात घातले आणि तिला वीजेचा धक्का बसला. यात चिमुकलीचा मृत्यू झाला.
या प्रकरणी कुटुंबातील कोणीही संपर्क केला नसल्याने आम्ही गुन्हा नोंदवला नसल्याचे जहांगिराबाद पोलीस ठाण्याचे एसएचओ अखिलेश प्रधान यांनी म्हटले आहे. या बाबत कुणी तक्रार घेऊन आल्यास नक्कीच कारवाई केली जाईल, असे प्रधान यांनी पुढे सांगितले. मोबाईलच्या चार्जरचा शॉक लागून अशाप्रकारे मृत्यू होण्याची हि पहिलीच घटना आहे.