मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – दोनच दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांनी स्त्रीसंग करण्याबाबत वक्तव्य केले असता यते अडचणीत आले होते. आता त्यांनी शिक्षकांची खिल्ली उडवणारे वक्तव्य केले असून त्याची क्लिप व्हायरल होत आहे. यात ते शिक्षक वर्गात येऊन कसा वेळ वाया घालवतात याबद्दल सांगताना शिक्षकांवर टीका केली आहे. तेव्हा त्यांच्या या वक्तव्यामुळे शिक्षक संघटना इंदुरीकर महाराजांवर नाराज झाल्या आहेत.
शिक्षक ३५ मिनिटाच्या तासात पाच मिनिट वर्गात जाण्यासाठी घालवतात. वर्गात आल्यावर फळ पुसायला पाच मिनिटे. आदल्या दिवशी काय झाले, ते सांगायला पाच मिनिटे. उरलेल्या वेळात उद्याच्या तासिकेला काय शिकवणार, हे सांगायला पाच मिनिटे. त्यांनतर तर तास संपला हेच सांगायची वेळ येते. हेच सांगत शिक्षक शिकवण्याच्या तासिका संपवतात, असे त्यांनी व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये म्हटले आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त करत महाराजांनी शिक्षकांची नोकरी कशी आरामदायी आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांनी ते स्वतःही शिक्षक असल्याचे विसरू नये आणि शिक्षकांची प्रतिमा मलीन करू नये, असे काही शिक्षकांनी म्हटले आहे.
कीर्तनातून प्रबोधन केले जाते, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण त्यांच्या कीर्तनात अनेकदा विडंबनही केले जाते. यावर प्रतिक्रिया देत ऍक्टिव्ह टीचर्स फोरम, महाराष्ट्र संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी किर्तनकारांचा हेतू हा प्रबोधनाचा असून अशा प्रकारे शिक्षकांची खिल्ली उडवून त्यांच्यावर टीका करणे अनाठायी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच शिक्षकांवर अशा प्रकारे भाष्य करण्यापेक्षा इंदुरीकर महाराजांनी समाज प्रबोधनाकडे लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरणारे यांनी दिली आहे.