अहमदनगर : आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या मनात पोहोचलेले तसेच सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची मुख्यमंत्र्यासोबतचे हितगुज सध्या चर्चेचा विषय बनत आहे. इंदुरीकर महाराज आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या संगमनेरमधील महाजनादेश यात्रेच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री आणि इंदुरीकर महाराज यांच्यातील हितगुजेमुळे महाराज भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे.
यावेळी थेट कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांविरोधात हि लढाई होणार असल्याचे म्हंटले जात आहे. थोरातांचा बालेकिल्ला असलेल्या संगमनेरात शुक्रवारी भाजपची महाजनादेश यात्रा पोहोचली होती. यावेळी इंदुरीकर महाराज मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बऱ्याचवेळा कानगोष्टी करताना दिसले आहे. त्यांच्या ह्याच गप्पा मात्र बाहेर चर्चांचा विषय ठरत आहे. थेट काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांच्या विरोधात इंदुरीकर महाराज संगमनेरमधून निवडणुक लढविणार असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र, याबाबत इंदुरीकर महाराज यांनी याबाबत कोणताही खुलासा केलेला दिसत नाहीये.
वारकरी संप्रदायातील लोकही इंदुरीकर यांनी निवडणूक लढवावी या गोष्टीचे समर्थन करत आहेत. शिर्डीचे काशिकानंद महाराज यांनी सांगितले कि, संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या विरोधात महायुतीकडे कोणताच चेहरा स्पष्ठ दिसत नाही. त्यामुळे जनतेच्या मनात प्रसिद्ध असलेलं इंदोरीकरांच नाव समोर येताना दिसत आहे. त्यामुळे आता खरंच इंदुरीकर महाराज महायुतीकडून संगमनेरमधून थोरातांच्या विरोधात निवडणूक लढवणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.