नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेत आणखी एक भारतीय कॉर्पोरेट जगात सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. व्हिडीओ चॅट ऍप चालवणार्या Zoom Inc ने भारतीय वंशाचे वेल्चमी शंकरलिंगम यांना इंजिनियरिंग हेड म्हणून नेमले आहे.
शंकरलिंगम Zoom Video Communications Inc चे सीईओ एरिक एस युआन यांना थेट रिपोर्ट करतील. ते कंपनीच्या अभियांत्रिकी व उत्पादन विभागाचे नवीन अध्यक्ष झाले आहेत. ते कंपनीच्या अभियांत्रिकी उत्पादन व डेव्हलपमेंट टीमचे कामकाज बघतील. त्यांची नियुक्ती १२ जूनपासून लागू होणार आहे.
भारतीय टॅलेंटचा डंका
विशेष म्हणजे अमेरिकेच्या टेक्निकल जगात भारतीय वंशाच्या कलागुणांना वाव मिळत आहे. गूगलचे सीईओ सुंदर पिचाई ते मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेलापर्यंत भारतीय प्रतिभेचे जगाला कौतुक आहे.
शंकरलिंगम यांनी VMware या सॉफ्टवेअर कंपनीत सुमारे ९ वर्षे काम केले होते, त्यानंतर ते झूम या व्हिडिओ चॅट अॅप चालवणाऱ्या कंपनीत जॉईन झाले. VMware मध्ये शेंकरलिंगम क्लाऊड सर्व्हिसेस डेव्हलपमेंट आणि ऑपरेशन्सचे व्हाईस प्रेसिडंट होते. VMware पूर्वी, ते WebEx येथे अभियांत्रिकी व टेक्निकल ऑपरेशन्सचे व्हाईस प्रेसिडंट होते.
चेन्नईमध्ये केले शिक्षण
शंकरलिंगम यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार त्यांना हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि सर्व्हिस इंडस्ट्रीजचा अनुभव आहे. त्यांनी चेन्नईच्या अण्णा विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समध्ये बीई केले आहे. त्यानंतर त्यांनी १९८९-९० मध्ये अमेरिकेच्या नॉर्दन इलिनॉइस युनिव्हर्सिटीमधून कंप्यूटर सायन्स मध्ये एमएस केले. त्यांनी १९९३ आणि १९९५ मध्ये स्टोनी ब्रूक विद्यापीठातून व्यवसाय आणि पॉलिसी मध्ये एमएस केले.
अलीकडेच झूम ऍपवर गोपनीयतेबाबत भारतासह अनेक देशात प्रश्न उपस्थित केले होते. असे असतानाही लॉकडाऊन दरम्यान भारतासह जगातील बर्याच देशांमध्ये हे ऍप बरेच लोकप्रिय झाले आहे. डिसेंबर २०१९ मध्ये झूमवर दररोज फक्त १ कोटी मिटिंग होत होत्या, पण एप्रिलमध्ये त्या वाढून ३० कोटी पर्यंत गेल्या.
अलीकडच्या काळात सुरक्षेसंदर्भात अतिशय कठोर उपाययोजना करण्याचा दावा झूमने केला आहे. कंपनीने वापरकर्त्यांना हे ऍप अपडेट करण्यास आणि प्रत्येक झूम मिटिंगसाठी वेगळा पासवर्ड सेट करण्यास सांगितले आहे.