लॉस एंजलिस : वृत्तसंस्था – अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे एका भारतीय युवकाची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. तेथील स्थानिक पोलिसांनी ही माहिती दिली आहे. मनिंदर सिंह साही (३१) असे त्याचे नाव असून तो विवाहित होता त्याला २ मुलं आहेत. साही हरियाणामधील करनाल येथील रहिवासी आहे. त्याला अमेरिकेत येऊन सहा महिने देखील झाले नव्हते.तोच त्याची हत्या करण्यात आली. त्याने राजकीय आश्रय घेतला होता. तो कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिस काउंटीच्या विट्टियर सिटीमधील 7-इलेवन ग्रॉसरी स्टोअर मध्ये तो काम करायचा. अमेरिकेतील त्याच्या नातेवाईकांनी सांगितले की तो घरात एकुलता एक कमाई करणारा होता आणि पत्नी आणि मुलांसाठी घरी पैसे पाठवायचा.
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार , ही घटना शनिवारी सकाळी ५ वाजून ४३ मिनिटांच्या आसपास घडली. प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की संशयित चोरीच्या उद्देशाने दुकानात आला होता. संशयिताचे छायाचित्र प्रसिद्ध करताना पोलिसांनी सांगितले की, “कोणतेही कारण नसताना संशयिताने पिस्तूलमधून गोळीबार केला ज्यामध्ये कारकुनाचा मृत्यू झाला.” पोलिसांनी सांगितले, “संशयित घटनास्थळावरून पळून गेला आणि तेव्हापासून तो फरार आहे.
दुकानात दोन ग्राहक होते ते देखील या हल्ल्यात जखमी झाले आहेत. ज्याने हा हल्ला केला तो कृष्णवर्णीय व्यक्ती होता, तसेच त्याचा चेहरा अर्धवट झाकण्यात आला होता. साहीच्या भावाने साहीचा मृतदेह भारतात पाठवण्यात यावा याकरिता आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. त्याने ‘गो-फंड पेज’ नावाचे वेबपेज बनवले आहे. त्याने या पेजवर रविवारी म्हंटले आहे की, “त्याच्या कुटुंबात आई -वडील त्याची पत्नी तसेच पाच आणि नऊ वर्षाची दोन मुले आहेत. मी त्याचे शव स्वदेशात पाठवण्यासाठी मदत मागत आहे. जेणेकरून त्याची पत्नी आणि मुलांना त्याला शेवटचं पाहता येईल”. अशा प्रकारचे भावनिक आवाहन साहीच्या भावाने केले आहे.