नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीने अलिकडेच आपली वेबसाइट अपडेट करुन रीलाँच केली होती. तसेच, Rail Connect ॲपमध्येही नवीन इंटरफेस आणि फिचर्ससह बदल केला होता. त्यानंतर आता IRCTC ने एक नवीन पेमेंट गेटवे IRCTC – iPay सेवा लाँच केली आहे. यामाध्यमातून प्रवाशांना तिकीट बुकिंग करणे सोपे जाणार असल्याचे सांगितले जात आहे. नुकतीच IRCTC ने प्रवाशांसाठी बस तिकिटींची सेवाही सुरु केली होती.
प्रवाशांच्या सोयी, सुविधेसाठी भारतीय रेल्वेकडून अनेकाविध उपक्रम राबले जात आहेत. प्रवाशांना तिकीट बुकिंग सोपे, जलद आणि सुलभ होण्यासाठी भारतीय रेल्वेकडून सातत्याने बदल केले जात असतात.याचा एक भाग म्हणजे IRCTC ने आपली वेबसाईट अपडेट केली आहे.
IRCTC -iPay चा वापर
IRCTC -iPay द्वारे प्रवाशांना बूक केलेल्या तिकिटासाठी पेमेंट करणे सहजसोपं होणार आहे. IRCTC -iPay द्वारे पेमेंट करण्यासाठी युजर्सना आपल्या UPI बँक अकाउंटच्या डेबिट कार्ड किंवा अन्य एखाद्या पेमेंट फॉर्मचा वापर करण्याची परवानगी आणि अन्य डिटेल्स द्यावी लागतील. याद्वारे प्रवासी काही सेकंदामध्येच ट्रेनचं तिकीट बूक करु शकणार आहेत. एकदा दिलेली माहिती भविष्यातील ऑनलाइन व्यवहारांसाठीही वापरता येईल. त्यासोबतच IRCTC वेबसाइट किंवा मोबाइल ॲपद्वारे तिकिट बूक केल्यानंतर IRCTC -iPay द्वारे इंस्टंट रिफंड देखील मिळेल. नवीन पेमेंट गेटवेमुळे युजर्सचा टाइमही वाचेल.
आत्मनिर्भर भारत व्हिजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताचे व्हिजन समोर ठेवून साइट आणि अॅपमध्ये बदल करण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेची वेबसाइट इंटरनेटच्या माध्यमातून तिकिटे उपलब्ध होणारी आशियातील सर्वात मोठी वेबसाइट ठरली आहे. प्रवाशांच्या सोयी, सुविधांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन व्यवहार सुलभतेसाठी आता एक पाऊल पुढे टाकत पेमेंट गेटवे लाँच करण्यात आल्याचे, IRCTC कडून सांगण्यात आले आहे.