लेह : लडाख मधील पेंगाँग लेक परिसरात गस्त घालत असताना भारतीय सैनिकांच्या उपस्थितीला चीन सैनिकांनी हरकत घेतल्याने दोन्ही देशाचे सैनिक परस्परांना भिडले. दोन्ही देशातील लष्कराने या भागातील सैनिकांच्या संख्येत वाढ केली आहे. लडाखमधील १३४ किमी लांब पेंगाँग लेक या तलावाच्या उत्तर किनाऱ्यावर हा प्रकार बुधवारी घडला. या तलावाच्या एक तृतियांश भागावर चीनचे नियंत्रण आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैनिक गस्त घालत असताना चीनच्या पिपल्स लिब्रेशन आर्मीचे सैनिक तेथे आले.
त्यांनी भारतीय सैनिकांच्या तेथील उपस्थितीवर हरकत घेतली. त्यामुळे सैनिकांमध्ये वादावादी होऊन ते परस्परांना भिडले. या घटनेनंतर दोन्ही बाजूने तेथील सैनिकांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. सिक्किम -भूतान, तिब्बत सीमेवरील डोकलाम येथे २०१७ मध्ये दोन्ही देशात अनेक दिवस तणाव निर्माण झाला होता. ७३ दिवस दोन्ही देशातील सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यानंतर चर्चा झाल्यानंतर चीनने सैनिक मागे घेतले व तणाव दूर झाला होता.
पेंगॉग लेक हे जगातील एकमेव असा तलाव आह, जो हिमालयातील रांगांमधील खारट पाण्याचा तलाव आहे. हजारो वर्षांपूर्वी या परिसरात समुद्र होता. हिमालयाची निर्मिती होत असताना हा भाग उचलला गेला. त्यातून जगातील सर्वात उंचावरील या खारट तलावाची निर्मिती झाली असे सांगितले जाते. अमीर खान यांच्या थ्री इडियट या चित्रपटाचे पेगाँग लेकला चित्रिकरण झाले होते. त्यानंतर या तलावाला भेट देणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. या भागातील नैसर्गिक वातावरण अनिश्चिततेचे असते.