नवी दिल्ली : वृत्तसंस्था- भारतीय सेनेच्या पूर्वी कमांडच्या कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. डच असं या कुत्र्याचं नाव आहे. डचने तब्बल 9 वर्षे देशाची सेवा केली. त्याने जमिनीत पुरलेले अनेक विस्फोटक, भूसुरुंग शोधून काढले आणि अनेक मोठ्या दुर्घटनांपासून देशाला वाचवलं आहे. डॉग स्कॉडमधील सर्वोत्तम जोखीम घेणारा कुत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डचचा 11 सप्टेंबर 2019 रोजी मृत्यू झाला.
दहशतवाद्यांविरोधी मोहिमेत सर्वात जास्त काळ काम करणारा डच
डच भारतीय जवानांसाठी महत्त्वाचा होता. डचला दिलेली प्रत्येक मोहिमेतील जबाबदारी त्याने इमानदारीने आणि योग्यरीत्या पार पाडली. वासाच्या मदतीने त्याने अनेक स्फोटकं शोधून ती निकामी करण्यासाठी जवानांना मदत केली आहे. डचला स्फोटकं आणि त्यात वापरण्यात आलेल्या वस्तूंच्या वासाबाबत विशेष ज्ञान होते. दहशतवाद्यांविरोधी मोहिमेत सर्वात जास्त काळ काम करणारा डच होता. डचचा जन्म 3 एप्रिल 2010 रोजी मेरठच्या आरव्हीसी सेटंर अँड कॉलेजमध्ये झाला होता.
मोदींच्या दौऱ्याआधी ट्रेनमध्ये शोधलं 7 किलोंचं IED स्टोटक
याआधीही डचने अलीपुरद्वार इथे कामाख्या एक्सप्रेसमध्ये 7 किलोग्रॅम आयईडी स्फोटकं असल्याचं शोधून काढलं होतं तेही मोदींच्या आसाम दौऱ्याआधी. यावेळी दहशतवादी आणि घुसखोरांच्या कुरापतीपासून अनेक नागरिकांचे प्राण वाचले. यात जवानांएवढाच डचचाही मोलाचा वाटा आहे. नोव्हेंबर 2014 मधील ही घटना आहे.
दोन वेळा झाला डचचा सन्मान
इस्टर्न कमांडकडून डचचा दोन वेळा सन्मान करण्यात आला आहे. आसाममधील गोलपारा येथे एका बसमध्ये आयईडी स्फोटकं असल्याचं डचने निदर्शनास आणलं होतं. त्यामुळे अनेक नागरिकांचा जीव वाचला आणि एक मोठी दुर्घटना टळली होती. डिसेंबर 2014 मधील ही घटना होती.