नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय महिला क्रिकेट विश्वात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. टीएनपीएलमध्ये मॅच फिक्सिंगची शक्यता असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून दोन जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. राकेश बाफणा आणि जितेंद्र कोठारी यांच्याविरुद्ध मॅच फिक्सिंग आणि फसवणूक केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट संघातील सदस्याला बाफणाने संपर्क करण्याचा प्रयत्न करत मॅच फिक्सिंगसाठी मोठी रक्कम देण्याचं आमिष दाखवलं. इंग्लंड विरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेची महिला क्रिकेट संघ तयारी करत असतानाचा फेब्रुवारीत घडलेला हा प्रकार आहे. ही मालिका आयसीसीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपचा भाग होती. अँटी करप्शन युनिटचे प्रमुख अजित सिंह सांगतात की, “दोन जणां विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिला क्रिकेटरनं बीसीसीआयला संपूर्ण माहिती दिली आहे. एका आरोपीशी झालेल्या संभाषणाचं रेकॉर्डिंगही महिला क्रिकेटरनं दिलं आहे.”
गुन्हा दाखल झालेल्यापैकी कोठारीने महिला क्रिकेटरला व्यवस्थापक म्हणून काम करण्याबद्दल सांगतिलं. तो इंस्टाग्रामवरून महिला क्रिकेटरच्या संपर्कात आला होता. त्याने महिला क्रिकेटरला दिलेल्या प्रस्तावावर तिने सही केली नाही. त्यानंतर कोठारीने बाफणाच्या मदतीने मॅच फिक्सिंगसाठी क्रिकेटरशी संपर्क केला. ओडिसातील बाफणाने भारत इंग्लंड यांच्यातील सामना फिक्स करण्यासाठी महिलेला ऑफर दिली होती. यासाठी त्याने महिला क्रिकेटरला 1 लाख रुपये देण्याची ऑफर दिली होती. बाफणाने मॅच फिक्सिंगसाठी प्रयत्न तर केलाच परंतु त्याचा कर्णधाराशी संपर्क करण्याचाही डाव होता. जेव्हा महिला क्रिकेटरला चुकीचं घडत असल्याचा संशय आला तेव्हा तिने सावध होत एसीयुला पू्र्ण प्रकरणाची माहिती दिली.