नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशभरात कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत असून कोरोनाच्या नव्या रुग्णांबाबत आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले गेले आहेत. गेल्या २४ तासात देशभरात तब्बल १ लाख ४५ हजार ३८४ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आता देशात सक्रीय रुग्णांची संख्या १० लाखांच्या पुढे गेली आहे. त्याचवेळी ७९४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
देशभरात गेल्या २४ तासात ७७ हजार ५६७ रुग्ण बरे झाले. देशभरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १३ कोटी २० लाख ५ हजार ९२६ झाली आहे. त्याचवेळी ११ कोटी ९९ लाख ८५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षा वेगाने वाढत आहे. दरदिवशी नवीन कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे.
गेल्या १६ सप्टेंबर २०२० रोजी २४ तासात ९७ हजार ८५९ नवीन कोरोना रुग्ण वाढले होते. गेल्या २४ तासात तब्बल १ लाख ४५ हजार ३८४ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे सक्रीय कोरोना रुग्णांची संख्येने ही नवा विक्रम केला आहे. सध्या देशभरात १० लाख ४६ हजार ३७६ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. गेल्या १६ सप्टेंबर रोजी १० लाख १० हजार ६६४ सक्रीय कोरोना रुग्ण होते. त्यापेक्षा आज अधिक सक्रीय रुग्ण देशभरात आहेत. आतापर्यंत ९ कोटी ८० लाख ७५ हजार १६० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.