सिडनी : वृत्तसंस्था – सोमवारी भारताने चांद्रयान 2 चे यशस्वी प्रक्षेपण केले. पुढील 48 दिवसांत हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. सोमवारी दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील तळावरून चांद्रयान 2 अवकाशात झेपावले. भारताचे चांद्रयान 2 पाहून ऑस्ट्रेलियातील नागरिक मात्र गोंधळात पडल्याचे दिसले. जीएसएलव्हीएमके 3 एम 1 प्रक्षेपकाने चांद्रयान 2 पृथ्वीच्या कक्षेत सोडले.
ऑस्ट्रेलियातील नागरिक गोंधळण्याचं कारण असं की, जेव्हा चांद्रयान 2 चं प्रक्षेपण झालं तेव्हा भारतात 2 वाजून 43 मिनिट झाले होते तर ऑस्ट्रेलियात रात्रीचे साडेसात वाजले होते. त्यामुळे अवकाशातील चांद्रयान ऑस्ट्रेलियन नागरिकांना केवळ आकाशात चमकणारा प्रकाश वाटला. ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील भागातून तसेच क्विन्सलँड परिसरातील नागरिकांना हा विचित्र प्रकाश वाटला त्यामुळे ते चकित झाले. अनेकांनी तर ही उडती तबकडी असल्याची शक्यताही वर्तवली.
वायव्य क्विन्सलँडमधील ज्युलिया खाडी परिसरातील कार्वान पार्क येथून शॉना रॉयस हिला आकाशात साडेसातच्या सुमारास काही चमकणाऱ्या रेषा दिसल्या. या प्रकाशाबाबत मॅकिन्ले परिसरातील स्थानिक नेत्यानेही भाष्य केलं आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळच्या सुमारास एका सामाजिक उपक्रमासाठी पैसे गोळा करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या डिनर पार्टीदरम्यान आकाशात चमकणारा प्रकाश दिसला. यावेळी आम्ही 160 जण उपस्थित होतो असेही त्या नेत्याने सांगितले.
जेकॉब ब्लंट नावाच्या व्यक्तीने तर या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केलं आहे. व्हिडीओच्या कॅप्शमनमध्ये त्याने म्हटलं आहे की, “आकाशात आज हा प्रकाश दिसला. हा व्हिडीओ पाहिला तर जेकॉब त्यात ओरडताना तुम्ही ऐकू शकता. “ते पहा, ते पहा… हे एलियन किंवा युएफओ आहे.” असे तो म्हणत आहे. याशिवाय नंतर जेकॉबने एसीबी नॉर्थ वेस्टच्या फेसबुक पेजवर पोस्ट केलं की, मला ती गोष्ट युएफओ असल्यासारखं वाटलं म्हणून मी त्याचे व्हिडीओ शुटींग केले. नंतर एसीबी नॉर्थ वेस्टनेही आपल्या फेसबुक पेजवरून हा प्रकाश म्हणजे भारताने अवकाशात प्रक्षेपित केलेले चांद्रयान 2 आहे असे म्हटले आहे.
असं का झालं ?
भारत आणि सिडनीमधील स्थानिक वेळेत पाच तासांचा फरक असल्याने भारतात दुपार असताना ऑस्ट्रेलियात रात्र झाली होती. त्यामुळे भारतात 2 वाजून 43 मिनिटे झाले तेव्हा ऑस्ट्रेलियात साडेसात वाजले होते. वरील फोटोत तुम्ही पाहू शकता की, चांद्रयान 2 अवकाशात झेपावल्यानंतर त्याचा प्रवास दक्षिणेकडे सुरु झाला. फोटोच्या डाव्या कोपऱ्यात श्रीलंका दिसते. चांद्रयान दक्षिण गोलार्धातून म्हणजेच ऑस्ट्रेलियावरून गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.