पुणे : बहुजननामा ऑनलाईन – 1 एप्रिल आला की, दरवर्षी टोल दरात (Toll Rates) वाढ होते. यंदाही झाली आहे. पुणे-सातारा रुंदीकरणाचं काम साडेदहा वर्षे रखडूनही कायम वाहतूक कोंडी , अपघात होऊनही कंत्राटदाराला 5 टक्के टोलवाढीचं बक्षिस देण्यात आलं आहे. पुणे-सातारा रस्ता 6 पदरी करण्याचं काम 1 ऑक्टोबर 2010 रोजी सुरू झालं होतं. हे काम 31 मार्च 2013 रोजी संपणं अपेक्षित होतं. परंतु अद्यापही हे काम अर्धवट असल्याचं दिसत आहे.
खेड शिवापूर टोल नाक्यावर एवढा टोल
या मार्गावर खेड शिवापूर आणि आनेवाडी असे 2 टोल नाके आहेत. खेड शिवापूर टोल नाक्यावर आजपासून हलकी वाहनं असतील तर एकेरी प्रवासासाठी 100 रुपये तर दुहेरी प्रवासासाठी म्हणजेच रिटर्न टोल 150 रुपये असेल. जर हलकी व्यावसायिक वाहनं असतील तर हेच दर अनुक्रमे 160 आणि 240 रुपये असतील. बस किंवा ट्रकसाठी अनुक्रमे 340 आणि 505 एवढा टोल असेल. मल्टी अॅक्सल वाहनांना एकेरी प्रवासासाठी 530 तर दुहेरी प्रवासासाठी 795 रुपये एवढा टोल असेल.
आनेवाडी टोल नाक्यावर एवढा टोल
आनेवाडी टोल नाक्याला मोटारी, हलकी वाहनं यांना एकेरी प्रवासासाठी 70 तर दुहेरी प्रवासासाठी 105, हलक्या व्यावसायिक वाहनांना अनुक्रमे 110 आणि 170, बस किंवा ट्रकला 235 आणि 350 तर मल्टी अॅक्सल वाहनांना एकेरीसाठी 365 तर दुहेरी प्रवासासाठी 550 रुपये एवढा टोल द्यावा लागणार आहे.
पुणे-नाशिक रोडवर टोलदरात वाढ
पुणे-नाशिक रस्त्यावर चाळकवाडी आणि हिवरगाव टोल नाक्यावरही यंदा टोल दरात वाढ झाली आहे. चाळकवाडी नाक्यावर हलकी वाहनं, मोटारी यांना एकेरी प्रवासासाठी 45 तर दुहेरीसाठी 70 तर बस आणि ट्रकला 160 व 240 रुपये एवढा टोल द्यावा लागणार आहे.
पुणे-सोलापूर रोडवर देखील टोलदरात वाढ
पुणे-सोलापूर रोडवर असणऱ्या पाटस टोलनाक्यावर मोटारी, हलकी वाहनं यासाठी एकेरी प्रवास असेल तर 75 आणि दुहेरी असेल तर 115 रुपये एवढा टोल द्यावा लागणार आहे. सरडेवाडी टोल नाक्यावर मोटारी, हलकी वाहनं यांना एकेरी प्रवासासाठी 80 तर दुहेरी प्रवासासाठी 120 एवढा टोल द्यावा लागणार आहे. बस किंवा ट्रकसाठी एकेरी प्रवास असेल तर 255 आणि दुहेरी असेल 380 रुपये एवढा टोल द्यावा लागणार आहे.
दरम्यान नियमित येणाऱ्या वेगळ्या ऋतुंप्रमाणे आता टोल दरवाढ देखील नियमित झाली आहे. टोलमुक्त महाराष्ट्र हे मृगजळच राहिल्याचं चित्र यावरून दिसत आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.