बहुजननामा ऑनलाईन
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील भरती सरुच आहे. आज परभणीचे माजी अपक्ष आमदार आणि अभ्युदय को ऑपरेटिव्ह बँकेचे मानद अध्यक्ष सीताराम घनदाट आणि त्यांचे नातू भरत घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित हा प्रवेश झाला आहे.
घनदाट हे परभणीतून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी विधिमंडळात शिपाई म्हणून 17 वर्षे काम केले होते आणि ट्रॅक्सी ड्रायव्हर म्हणून 3 वर्षे काम केले होते. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनीही खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. यावेळी प्रिया बेर्डे यांचा मुलगा अभिनय आणि स्वानंदी देखील उपस्थित होते. यावेळी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.
तर जुलै महिन्यात शिवसेनेचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या या प्रवेशावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनंतर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर या नगरसेवकांनी अवघ्या चार दिवसांत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. पाच नगरसेवकांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून शिवसेनेत प्रवेश केला.