पुणे बहुजननामा ऑनलाईन- आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत त्यातच पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी चार विधानसभा मतदार संघामध्ये पक्षाकडून निवडणूक लढविण्यास उमेदवारच इच्छूक नसल्याचे समोर आले आहे. पक्षाकडून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. परंतु शहरातून केवळ २० ते २२ जणांचेच अर्ज आलेले असून कोथरूड, हडपसर, पर्वती, वडगावशेरी, खडकवासला मतदारसंघात अतिशय नगण्य प्रतिसाद मिळाला आहे. कॉंग्रेसकडून पुण्यातील आठ मतदारसंघापैकी शिवाजीनगर, कॅन्टोंन्मेंट, कसबा या तीन मतदारसंघात उमेदवारीसाठी चुरस असणार आहे. पक्षाकडून सर्व विधानसभांसाठी हे अर्ज मागण्यिात आले होते. मात्र, पक्षाकडे तीनच मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार आहेत. तर इतर ठिकाणी पक्षाला आलेला प्रतिसाद अतिशय नगण्य आहे.
शिवाजीनगर, कसब्यात तिकिटासाठी चढाओढ
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस २०१४ मध्ये हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यात शिवाजीनगर, कसबा आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे आघाडीच्या जागा वाटपात कॉंग्रेसकडून या तीनही जागांवर दावा सांगण्यात येणार आहे. परिणामी या तीनही मतदारसंघात कॉंग्रेसकडे इच्छूकांची संख्या जास्त आहे. शिवाजी नगर मधून माजी नगरसेवक दत्ता बहिरट, संजय अगरवाल, माजी अमदार दिप्ती चवधरी, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, ज्ञानेश्वर मोझे, तसेच कैलास गायकवाड यांनी पक्षाकडून अर्ज नेले आहेत.
तर कसब्यातून पक्षाचे विद्यमान गटनेते अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर, विरेंद्र किराड, मिलिंद काची , मुख्तार शेख, विनय ढेरे यांनी अर्ज नेले आहेत, तर कॅन्टोन्टोन्मेंट मधून माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, नगरसेवक अविनाश बागवे यांच्यासह, रविंद्र आरडे, मुकेश धिवार, करणसिंग मकवाना, नगरसेविका लता राजगुरू यांनी अर्ज नेले आहेत. तर या तीनही मतदारसंघातील काही प्रमुख उमेदवारांनी थेट प्रदेशकडे अर्ज केले आहेत. त्यात बागवे यांच्यासह, अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांचे अर्ज आहेत.शिवाजीनगर मधून २०१४ मध्ये विनायक निम्हण कॉंग्रेसच्या तिकिटावर लढले होते. मात्र, आता ते शिवसेनेत आहेत, तर कसब्यातून रोहीत टिळक यांनी कॉंग्रेसकडून निवडणूक लढविली होती. तर धंगेकर यांनी मनसेतून त्यामुळे आता धंगेकर कॉंग्रेसमध्ये असल्याने कसब्यात, गटनेते शिंदे, धंगेकर तसेच रोहीत टिळक यांच्यात तिकिटासाठी चढाओढ असणार आहे.
या पाच मतदारसंघात उमेदवारांची आहे वानवा
खडकवासला -एकही अर्ज नाही
कोथरूड – अवघा संदीप मोकाटे
हडपसर – बाळासाहेब शिवरक
वडगाव शेरी – रमेश सकट, भीवसेन रोकडे आणि विकास टिंगरे
पर्वती- नरेंद्र व्यवहारे, मुकेश धिवार, आणि सचिन तावरे