पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन तेथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी अश्लिल बोलणाऱ्याला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजी शहाजी समिंदर (वय ३२, रा़ आंबेडकर वसाहत, डि पी रोड, औंध) असे त्याचे नाव आहे. ही घटना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात २७ जून रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली होती.
या प्रकरणी पोलीस नियंत्रण कक्षातील महिलेने फिर्याद दिली आहे. शिवाजी समिंदर हा ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याने २७ जून रोजी दुपारी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. तो फोन घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्याना त्याने पोलीस काही कामाचे नाही. पोलीस खाते बंद करा असे म्हणून अश्लिल शिवीगाळ केली व तु भेट तुला बघून घेतो, अशी धमकी दिली.
याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन आलेल्या नंबरवरुन समिंदर याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.