नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाउनमध्ये मागील 18 दिवसांत इंधनाचे दर भडकले आहेत. देशभरात आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोलच्या दरात 17 पैसे ते 20 पैसे अशी वाढ झाली असून डिझेलच्या दरात 47 ते 55 पैसे अशी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचा सरासरी दर हा 86.85 रुपये तर डिझेलचा दर 77.49 रुपये इतका झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले आहे.
भारतात आता पेट्रोल-डिझेलच्या सुधारित किंमती दररोज सकाळी 6 वाजता जाहीर होत आहेत. जागतिक स्तरावर तेलाच्या किंमती दर मिनीटाला बदलत आहेत. त्याचा थेट परिणाम इंधनाचे वापरकर्ते आणि डिलर्स यांच्या खरेदी किंमतीत होत आहे. भारतातील या इंधनाच्या किंमतींमध्ये उत्पादन शुल्क, व्हॅट, डिलर्सचं कमिशन या बाबींचा समावेश असून संबंधित राज्यांप्रमाणे या करांमध्ये बदल होत असल्याने इंधनाच्या दरांतही बदल दिसून येत आहे. तीनही कर पेट्रोल-डिझेलच्या मूळ दरात समाविष्ट झाल्याने त्यांची किरकोळ विक्रीची किंमत जवळपास दुप्पट होते. त्याचबरोबर रुपयाच्या मुल्याचा डॉलरच्या तुलनेत झालेला बदलही इंधनाच्या किंमतींवर परिणाम होतो. त्यामुळे डॉलरच्या दरात आंतराष्ट्रीय स्तरावर इंधनाचा दर वाढल्यास भारतातही इंधनाच्या दरात वाढ होते.
आजच्या दरवाढीनुसार, देशातील महानगरांमधील दरवाढ अशी दिल्ली (पेट्रोल – 79.76, डिझेल -79.88), मुंबई (पेट्रोल – 86.54, डिझेल-77.76), चेन्नई (पेट्रोल – 83.04, डिझेल-76.77), कोलकाता (पेट्रोल – 81.45, डिझेल-74.63) इंधनाचा दर आहे. मुंबई – (पेट्रोल – 86.54, डिझेल-77.76) नागपूर – (पेट्रोल – 87.05, डिझेल-78.31) पुणे – (पेट्रोल – 86.26, डिझेल-76.32) नाशिक – (पेट्रोल – 86.90, डिझेल-76.94) औरंगाबाद – (पेट्रोल – 87.62, डिझेल-78.85)