बहुजननामा ऑनलाईन टीम – दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणार्या आंतरराष्ट्रीय स्मारकात बाबासाहेबांचा 450 फूट उंचीचा पुतळा उभारण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या आधीच स्मारकाच्या खर्चात सुमारे 300 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. पुतळ्याची उंची वाढविल्याने आणखी खर्च वाढणार आहे.
इंदू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय भव्य आंबेडकर स्मारक उभारण्याचा 2013 मध्ये निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास (एमएमआरडीए) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता देण्यात आली. 2018 मध्ये या स्मारकाचा खर्च 763 कोटी 5 लाख रुपये इतका निश्चित करण्यात आला होता.
जुलैमध्ये कामाचा आढावा घेऊन अंदाजे 1089 कोटी 95 लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार दोन वर्षांत 326 कोटी 90 लाख रुपयांची वाढ झाली आहे. स्मारकात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची 450 फूट करण्याचा प्रस्ताव होता. राज्य शासनाने त्याला मान्यता दिली आहे.