बंगळुरु : वृत्तसंस्था – लिंगायत मठाच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच एका मुस्लीम व्यक्तीची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मठाधिपती म्हणून एखादी विवाहित आणि त्यातही मुस्लीम व्यक्ती यापूर्वी कधीही नेमण्यात आली नव्हती. कर्नाटकातल्या गदगजवळच्या कोणेश्वर संस्थान शांतीधाम मठाच्या प्रमुखपदी दिवाण शरीफ रहिमतसाब मुल्ला (वय-33) यांनी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लिंगायत समाजाच्या मठांचे स्वामी सर्वसाधारणपणे संन्यासी, ब्रह्मचारी असतात. पण दिवाण शरीफ हे विवाहित असून त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. 10 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांनी दिक्षा घेतली होती.
लिंगायत समाज हा स्वामी बसवेश्वरांना मानणारा समाज आहे. दिवाण शरीफ मुल्ला हे मुस्लीम समाजात जन्माला आले असले तरी त्यांचे आई – वडील बसवेश्वरांचे निस्सीम भक्त होते. त्यामुळे त्यांच्यावर लहानपणापासूनच लिंगायत धर्माचे संस्कार झाले. 26 फेब्रुवारी पासून ते मठाधिपती म्हणून काम पाहणार आहेत. असुती मठ कलबुर्गीतल्या खजुरी गावातल्या कोरणेश्वर संस्थानशी संलग्न आहे. या कोरणेश्वर संस्थानाला 350 वर्षांची परंपरा आहे. खजुरी मठाचे पीठाधिपती मुरुगराजेंद्र कोरणेश्वर शिवयोगी पुढाकाराने दिवाण शरीफ मुल्लांची नेमणूक करण्यात येणार आहे.
दिवाण शरीफ यांनी लिंगायत समाजाची दीक्षा घेण्या अगोदरपासून लिंगायत धर्माचा अभ्यास करत आहेत. मला पवित्र बंधन बांधल गेलं आणि या विश्वाची जबाबदारी दिली गेली. हा प्रवास खडतर होता. माझ्या आई – वडिलांनी स्वामी बसवेश्वरांना मुलगा अर्पण केला होता. मलासुद्धा आता त्याचप्रमाणे स्वामींच्या शिकवणीचा प्रसार करायचा असल्याचे दिवाण शरीफ यांनी सांगितले.