सांगली : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातच कोरोनाचे थैमान सुरूच आहे. अशातच कोरोनामुळे अवघ्या 13 तासात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शिरशी (ता. शिराळा) येथे घडली आहे. कुटुंबातील पती-पत्नी अन् मुलाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
सहदेव विठ्ठल झिमुर (वय 75), पत्नी सुशीला झिमुर (वय 66) तसेच मुलगा सचिन झिमुर (वय 30) असे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची बाधा झाल्याने सहदेव झिमुर यांच्यावर गेल्या 22 दिवसांपासून खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांची पत्नी सुशीला, मुलगा सचिन यांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सचिन हा मुंबई येथे एका खाजगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. तो लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यांपूर्वीच शिरशी येथे आला होता. सहदेव यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच ते घरी आले होते. मात्र पुन्हा त्रास जाणवत असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र मंगळवारी (दि. 18) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शिरशी येथे आणून त्यांच्यावर पुतण्या रोहितने अंत्यसंस्कार केले. सहदेव यांचा मृत्यू होऊन बारा तास होताच सायंकाळी 5 वाजता पत्नी सुशीला यांचेही निधन झाले. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू असतानाच एक तासात म्हणजे सायंकाळी सहा वाजता मुलगा सचिन याचाही मृत्यू झाला. तेरा तासांत बघताबघता एक कुटुंब संपले. सचिनचा एक वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ते दोघे पती-पत्नी मुंबईत रहात होते. सचिन यास दोन विवाहित बहिणी आहेत.