बहुजननामा ऑनलाईन – देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाने खोटे ट्विट करण्यात आल्याचे समोर आले आहे. यानंतर आक्रमक झालेल्या भाजपने बनावट ट्विट करणाऱ्या संबंधिताविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या संदर्भात गुरुवारी माहिती दिली.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाने बुधवारी एक ट्विट प्रसिद्ध झाले होते. मात्र या हॅन्डलवरुन हे ट्विट करण्यात आले, ते अडवाणी यांचे नाही, असे प्रसारमाध्यमांना आढळून आले. त्याचबरोबर अडवाणी यांचे ट्विटरवर अकाउंटच नसल्याचा खुला अडवाणी यांचे स्वीय सहाय्यक दीपक चोप्रा यांनी केला.
खोटे ट्विट करुन सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्यांचे भांडे फुटले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाने खोटे ट्विट करणाऱ्या संबंधिताचा शोध घ्या व त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशा मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.