मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्कार्पिओ गाडीत स्फोटक सापडल्याप्रकरणी एनआयएने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. या प्रकरणात एनआयएला अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. अंबानीच्या घराजवळील स्फोटके, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सहभागी संशयित मर्सिडीज कार देखील जप्त केली आहे. तसेच एनआयएने वाझे यांच्या सीआययू कार्यालयातून त्यांचा मोबाईलसह कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. याशिवाय वाझे यांच्या इमारतीतील डीव्हीआर जप्त केल्याचे सूत्रानी सांगितले. याप्रकरणी एनआयएने आतापर्यंत गुन्हे शाखेच्या सात पोलिसांची चौकशी केली आहे.
एनआयएमधील सूत्रांच्या माहितीनुसार, वाझे प्रकरणात एका इनोव्हा कारची माहिती समोर आल्यानंतर आता एक मर्सिडीज कार जप्त केली आहे. या कारमधून वाझे हे हिरेनला भेटले असून त्यावेळी स्कॉर्पिओ कारच्या चाव्या हिरेनकडून घेतल्याचा एनआयएला संशय आहे. प्रत्यक्षात ही कार चोरी झालीच नव्हती. एनआयएला मर्सिडीज कारचे सीसीटीव्ही फुटेज सापडले असून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेरील आहेत. या मर्सिडीजमध्ये मनसुख हिरेन बसल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्हीनुसार, हिरेन कोणाची तरी वाट पाहत होते. त्यानंतर काही वेळानंतर ही मर्सिडीज कार आली आणि त्यात बसून ते निघून गेले. ती कार वाझे हेच वापरत असल्याचा एनआयएनला संशय आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी या कारची तपासणी केली. त्यात काही शर्ट, पैसे आणि बाटली सापडली आहे. याच कारमधून पीपीई किटही नेण्यात आल्याचा संशय आहे.