नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीआयसीआय बँकेने एक अशी सुविधा सुरू केली आहे, ज्याद्वारे तुम्ही केवळ मोबाईल नंबर आणि पॅन कार्डद्वारे शॉपिंग करू शकता तसेच हा खर्च ईएमआयमध्ये सुद्धा कन्व्हर्ट करू शकता. बँकेने या सुविधेला कार्डलेस ईएमआय नाव दिले आहे. बँकेने म्हटले की, या सुविधेचा फायदा घेऊन बँक ग्राहक डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि मोबाईलच्या डिजिटल वॉलेटऐवजी केवळ मोबाईल फोन आणि पॅनच्या मदतीने शॉपिंग करू शकतात.
कसा मिळेल फायदा
हा पूर्णपणे डिजिटल ईएमआय प्लॅन आहे, जो त्यांनी पाईन लॅबसोबत भागीदारीत सुरू केला आहे. या अंतर्गत ग्राहकांना केवळ बँकेशी रजिस्टर्ड आपला मोबाईल नंबर आणि पॅन नंबर सांगून तसेच मोबाईलवर येणारा ओटीपी सांगून पीओएस मशीनच्या माध्यमातून शॉपिंग करता येईल. यासाठी पात्र ग्राहक कोणत्याही दुकानात किंवा शोरूममध्ये कार्डलेस ईएमआय पर्याय निवडण्यास सांगतील आणि दुकानदार त्यांना सुविधा देईल.
या सुविधेचा लाभ मिळेल
* कार्डचा वापर न करता प्रमुख किरकोळ विक्रेत्यांकडून खरेदी करता येईल.
* प्रमुख ब्रँडवर मिळते नो कॉस्ट ईएमआय सुविधा.
* बँक या सुविधेसाठी प्रोसेसिंग चार्ज घेत नाही.
* ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, कॉन्टॅक्टलेस आणि सुरक्षित आहे.
* ग्राहक 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत खरेदी करू शकतो.
* ग्राहक 3 ते 15 महिन्यापर्यंत कालावधी निवडू शकतो.
कोणत्या ठिकाणी मिळेल सुविधा
आयसीआयसीआय बँक रिटेल स्टोअर्सवर पूर्णपणे डिजिटल, कार्डलेस ईएमआय सुविधा सादर करणारी पहिली बँक आहे. बँकेने क्रोमा, रिलायन्स डिजिटल, माय जिओ स्टोअर्स आणि संगीता मोबाइल्स सारख्या प्रमुख घाऊक विक्रेत्यांच्या देशातील आऊटलेटसमध्ये ही सुविधा देण्यासाठी एक प्रमुख मर्चेन्ट कॉमर्स प्लॅटफॉर्म पाइन लॅब्ससोबत करार केला आहे. या स्टोअर्सवर ग्राहक कॅरियर, डायकिन, डेल, गोदरेज, हायर, एचपी, लेनोव्हो, मायक्रोसॉफ्ट, मोटोरोला, नोकिया, ओप्पो, पॅनासोनिक, तोशिबा, विवो, व्हर्लपूल आणि एमआयसारख्या प्रमुख ब्रँडची उपकरणे खरेदी करण्यासाठी कार्डलेस ईएमआय सुविधेचा लाभ घेऊ शकतात. बँक येणार्या महिन्यात या सुविधेअंतर्गत अनेक बँड जोडणार आहे.