नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खासगी बँक असलेल्या आयसीआयसीआयने आपल्या ग्राहकांसाठी नवी सुविधा सुरू केली आहे. आयसीआयसीआय बँकेने मंगळवारी एटीएममधून कार्डलेस कॅश विड्रॉल सुविधा सुरू करण्याची घोषणा केली. या सुविधेद्वारे ग्राहक बँकेच्या आयमोबाइल या मोबाइल बँकिंग अॅप्लिकेशनद्वारे बँकेच्या 15,000 पेक्षा जास्त एटीएममधून कॅश काढू शकतात. ही डेबिट कार्डशिवाय रोख रक्कम काढण्याची एक सोपी पद्धत आहे. या सुविधेअंतर्गत रोजच्या व्यवहाराची मर्यादा 20,000 रुपये आहे.
या नव्या सुविधेची माहिती देताना आयसीआयसीआय बँकेचे एक्झीक्युटिव्ह डायरेक्टर अनूप बागची यांनी म्हटले की, आयसीआयसीआय बँक सुरूवातीपासूनच डिजिटल बदलांमध्ये पुढे आहे. कार्डलेस विड्रॉलमुळे आमच्या ग्राहकांना रोजच्या वापरासाठी सुरक्षित पद्धतीने रोख रक्कम काढता येणार आहे.
आम्हाला वाटते की, डेबिट कार्डशिवाय आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून रोकड काढण्याच्या या सुविधेमुळे ग्राहकांना एक वेगवान आणि वेगळा अनुभव मिळणार आहे. आम्ही आयसीआयसीआय बँकेचे सर्व चॅनल आणि टच – पॉइंट्समध्ये नवीन टेक्नोलॉजीचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. यामुळे ग्राहकांचे बँकिंग अधिक सोपे होणार आहे.
कार्डलेस कॅश विड्रॉलचे फायदे –
* रोजच्या वापरासाठी रोख रक्कम काढताना सोबत डेबिट कार्ड असण्याची गरज नाही. एटीएम पिन लक्षात ठेवणे आणि वापरण्याची आवश्यकता नाही.
* आयसीआयसीआय बँकेच्या 15,000 पेक्षा जास्त एटीएममध्ये सुविघा उपलब्ध.रोज 20,000 रुपयांपर्यंत रोकड काढता येणार.
* आयमोबाइल अॅपचा वापर करून रोख रक्कम काढण्याची सुरक्षित आणि विश्वासू पद्धत.
असे काढा पैसे –
* आयमोबाइल अॅप मध्ये लॉग इन करा आणि सर्व्हिस अॅण्ड कॅश विड्रॉल अॅट आयसीआयसीआय बँक एटीएम ऑपशन निवडा.
* रक्कम टाका, खाते क्रमांक निवडा, 4 अंकी अस्थायी पिन बनवा आणि सबमिट करा.
* एक रेफरन्स ओटीपी (वन टाइम पासवर्ड) येईल.
* आयसीआयसीआय बँकेच्या कोणत्याही एटीएममध्ये जा.
* कार्डलेस कॅश विड्रॉल निवडा, मोबाइल नंबर, रेफरन्स ओटीपी नंबर, एटीएम पिन आणि रक्कम टाका.
* यानंतर आपल्याला पैसे मिळतील.
* रोख रक्कम काढण्याची विनंती आणि ओटीपी दुसर्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत मान्य असेल.