सातारा : बहुजननामा ऑनलाईन – कोरेगाव-भीमा, हिंसाचारप्रकरणी झालेल्या एल्गार परिषद सभेवर ठपका ठेवत देशभरात अनेकांच्या उचलबांगड्या झाल्या होत्या. या प्रकरणानंतर आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांना लक्षात घेऊन त्या अनुषंगाने राज्यभरात दलित आणि मुस्लिम समाजाची एकत्र मोट बांधून ठीक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली. दरम्यान, आज दि. २५ रोजी सातार्यातील गांधी मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या सभेचे आयोजन करण्यात आले. मात्र, या सभेवर स्थानिक पोलिसांबरोबरच राज्य गुप्तचर यंत्रणा त्याचबरोबर केंद्रीय गुप्तचर यंत्रणा (IB) ची करडी नजर असणार आहे .
सध्या संपूर्ण महाराष्ट्राभर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अॅड्व्होकेट. प्रकाश आंबेडकर तसेच बॅ. असदुद्दिन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील मोठ-मोठ्या सभा सुरु आहे. राज्यभर या सभांना चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे राज्य व केंद्र सरकारने या सभांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश गृहखात्याने दिले आहेत. त्यानुसार राज्य गुप्तचर यंत्रणा तसेच केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी सातारा पोलिसांच्या मदतीने सातार्यात तळ ठोकून आहेत. या सभांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांना राज्य गृह विभागाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत.
विदर्भ, मराठवाडा पिंजून काढल्यानंतर आज दि. २५ रोजी सातारा येथील गांधी मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी सातारा जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून हजारो लोक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने. ही बाब लक्षात घेता सातारा पोलीस, राज्य गुप्तचर यंत्रणा त्याचबरोबर केंद्रीय गुप्तचर यंत्रणा (IB) अलर्ट झाले असून अनेक अधिकारी साध्या वेशात जेथे सभहोणार आहे त्या स्थळी आणि सोशल मीडियावर करडी नजर ठेवून आहेत.