IAS Puja Khedkar | पुजा खेडकर यांना पुणे पोलिसांचे समन्स, छळ प्रकरणात पुण्यात येऊन जबाब नोंदवण्याचे निर्देश

पुणे : – IAS Puja Khedkar | वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Pune Collector Dr Suhas Diwase) यांनी छळ केल्याची तक्रार केली आहे. त्यानुसार वाशिम पोलिसांकडून (Washim Police) हे प्रकरण पुणे पोलिसांकडे (Pune Police) वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे त्या प्रकरणाची चौकशी आता पुणे पोलिसांकडून सुरु असून, खेडकर यांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवावा, असे समन्स पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना बजावले आहे. खेडकर यांनी छळ झाल्याची तक्रार वाशिम पोलिसांकडे दिली आहे. हा प्रकार पुण्यातील असल्यामुळे पुढील चौकशीसाठी हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यासाठी वाशिम पोलिसांचे एक पथक पुण्यात दाखल झाले. आता यासंदर्भात पुणे पोलीस चौकशी करणार आहेत.
खेडकर यांची पुण्यात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती केली होती. या कालावधीत सुहास दिवसे यांनी छळ केल्याचा आरोप पूजा खेडकर यांनी केला. खेडकर यांची सोमवारी वाशिम पोलिसांनी चौकशी केली. त्यांनी नोंदवलेल्या जबाबात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी छळवणूक केल्याचा आरोप केला आहे.
हा प्रकार पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील असल्याने पूजा खेडकर यांची तक्रार वाशिम पोलिसांनी पुणे पोलिसांकडे वर्ग केली आहे. प्रशिक्षणार्थी असताना खेडकर यांनी खासगी ऑडी कारवर अंबर दिवा लावला. तसेच कारवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली. त्यांनी स्वत:साठी स्वतंत्र केबीन घेतले, तसेच शिपाई घेतले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी दिवसे यांनी राज्य सरकारकडे तक्रार केली. त्यानंतर पूजा खेडकर यांची वाशिम येथे बदली करण्यात आली.
यासंदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, पुणे पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. खेडकर यांनी पुण्यात येऊन पोलिसांकडे जबाब नोंदवावा, असे समन्स पूजा खेडकर यांना बजाविण्यात आले आहे.
Comments are closed.