IAS Puja Khedkar – Dr Suhas Diwase | IAS पूजा खेडकर यांची जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधातील तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग, तपासानंतर पुढील निर्णय

July 17, 2024

पुणे : – IAS Puja Khedkar – Dr Suhas Diwase | वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Pune Collector Dr Suhas Diwase) यांच्या विरोधात वाशिम येथे छळाची लेखी तक्रार दाखल केली आहे. वाशिम पोलिसांनी (Washim Police) ती तक्रार पुणे पोलिसांकडे (Pune Police) वर्ग करण्यात आली आहे. वाशिमच्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चमूसोबत सोमवारी (दि.15) रात्री उशिरा तीन तास पूजा खेडकर यांनी बंद दाराआड चर्चा केली होती.

पूजा खेडकर प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत असताना यामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे देखील नाव घेण्यात आले आहे. सुहास दिवसे यांनी आपला मानसिक छळ केल्याची तक्रार पूजा खेडकर यांनी केली आहे. पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी असताना हा छळ झाल्याचा आरोपी त्यांनी केला आहे. याबाबत खेडकर यांनी वाशिम पोलिसांकडे तक्रार केली असून वाशिम पोलिसांनी ही तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग केली आहे. पुणे पोलीस याच्या कायदेशीर बाबी तपासत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलीस सर्व गोष्टी तपासून पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आयएएस पूजा खेडकर यांचे अनेक वादग्रस्त प्रकार समोर आले. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडे त्याचा अहवाल पाठवल्यावरच पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली. त्यांनी यूपीएससीची परीक्षा देताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडले होते. त्याआधारे त्यांनी परीक्षा देत विशेष सवलत मिळवून आयएएस बनल्याचे समोर आले. तब्बल 11 वेळा परीक्षा दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान पूजा खेडकर यांना पुढील कारवाईसाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरी इथं त्यांना 23 जुलैपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दिवसे यांनी केली होती तक्रार

पूजा खेडकर यांच्याविरोधात सुहास दिवसे यांनी सर्व प्रथम तक्रार दाखल केली होती. प्रशिक्षणार्थी असलेल्या खेडकर यांनी स्वतंत्र गाडी, बंगला, कर्मचारी, सुरक्षा, शिपाई, स्वतंत्र केबिनची मागणी केली होती. मात्र, प्रशिक्षणार्थी पातळीवर या सुविधा दिल्या जात नसतानाही त्यांनी आपल्या खासगी ऑडी कारला लाल रंगाचा दिवा लावला होता. या सर्व प्रकारानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अप्पर मुख्य सचिवांना पत्र लिहून यासंदर्भात तक्रार केली होती.