सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – हैदराबाद प्रकरणातील पीडितेवर बलात्कार करून जाळून हत्या केलेल्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी पहाटे ३ वाजता एन्काऊंटर केला आहे. पोलिसंनी केलेल्या या कारवाईमुळे देशभरातून कौतुक आणि आभार केलं जात आहे. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनीदेखील हैद्राबाद पोलिसांचे अभिनंदन करत पीडित मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली असेल अशी प्रतिक्रिया दिली. ‘हैदराबाद प्रकरणात जी कारवाई करण्यात आली, त्यामुळे देशातील इतर पोलिसांना हिंमत मिळाली असेल. सरकारने पोलिसांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. ही फाईल बंद करा, कायद्यात चौकटीत ही घटना आणणं योग्य नाही, असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी मांडलं.
तसेच पोलिसांच्या या कारवाईने देशातील महिला आणि मुलींना बळ मिळालं आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. सरकारने आणि कोर्टाने त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. उन्नावबाबतीत जे घडलं तसं यापुढे व्हायला नको. आरोपींनी जेलमधून सुटून बलात्कार पीडितेला जाळलं हे कृत्य निषेधाचं असल्याचंही प्रणिती शिंदे यांनी म्हंटल आहे. हैदराबाद पोलिसांवर फुलांचा वर्षाव करुन त्यांचे स्वागत सर्वसामान्य करीत असताना दुसरीकडे मात्र पोलिसांनी केलेल्या या थेट एन्काऊंटरची चौकशी व्हावी, अशी मागणी वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मागणी केली आहे.
‘एन्काऊंटरमुळे फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, पोलिसांच्या ताब्यात असताना असं एन्काऊंटर होतं. यातील मुख्य सूत्रधार समोर येत नाही, एन्काऊंटर केले की घडवले याची सीआयडी अथवा सीबीआय चौकशी झाली पाहिजे. आरोपी खरे होते की नाही, का पुरावे नष्ट करण्यासाठी हि कारवाई करण्यात आली. यासाठी पोलीस काही लोकांना अटक करतात. जर ते आरोपी खरेच असते तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली असती, तरी या घटनेची चौकशी व्हायला हवी अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
Visit : bahujannama.com