बहुजननामा ऑनलाईन टीम : आजकाल एखादी वाईट घटना घडत असेल तर लोक त्यांची मदत करण्याऐवजी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्याला जास्त प्राधान्य देतात. असाच एक लाजिरवाणी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. बिहारमधील सीवान स्टेशनवर एका सपत्निक प्रवास करत असलेल्या एका प्रवाशावर दिवसाढवळ्या त्यांच्या पत्नीसमोर गोळ्या झाडण्यात आल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीला जवळ घेऊन पत्नी लोकांना मदतीसाठी विनंती करत होती मात्र कोणीच मदतीसाठी आले नाही. अखेर त्या व्यक्तीने पत्नीच्या मांडीवरच प्राण सोडले. हा प्रकार घडत असताना लोक मदतीला येण्या ऐवजी त्यांचा व्हिडिओ काढत होते.
मिळालेल्या माहितीनूसार, मृत व्यक्ती कोलकाता येथे व्यापारी असल्याचे समोर आले आहे. रविवारी दुपारी मोहम्मद फैझल हे आपली नवविवाहित पत्नी अंजूम खातून हिच्यासह सिवास रेल्वे स्टेशनवर कोलकाता येथे जाणाऱ्या बाघ एक्सप्रेसची वाट पाहत होते. त्याच दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने फैझल यांच्यावर मागून गोळीबार केला. त्यानंतर पत्नीने लोकांना विनंती केली असता लोक मदती ऐवजी त्यांचा व्हिडिओ काढण्यात दंग होते.
काही वेळाने एक पोलीस तेथे आला आणि चौकशी करुन निघून गेला. त्याचवेळी फैझलने प्राण सोडले. फैझल यांचा सहा महिन्यांपुर्वीच विवाह झाला होता. तो कोलकात्याहून सिवान येथे आपल्या पत्नीला नेण्यासाठी आला होता. त्याचवेळी हा प्रकार घडला. हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. तसेच ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला. त्या प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची बाब उघड झाली आहे.
Visit : bahujannama.com