वसई : बहुजननामा ऑनलाईन – पती-पत्नीचे नाते हे अतूट असते. पती किंवा पत्नीचा दुरावा झाल्याने अनेक घटना घडल्याचे ऐकले असेलच. वसईतही अशाचप्रकारची घटना घडली. 72 वर्षीय पत्नीचा हृदयविकाराच्या तीव्र धक्याने मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे सहन न झाल्याने अवघ्या पाच तासांतच पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना वसईच्या पश्चिम भागातील रानगाव मर्सिस सांगोडेवाडी येथे घडली.
वेरोनिका जॉन डायस असे या महिलेचे नाव आहे. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर पाच तासांतच त्यांचे जॉन अँटोनी डायस या 75 वर्षीय पतीचा मृत्यू झाला. वेरोनिका यांनी बृहन्मुंबई महापालिका शाळेत 28 वर्षे शिक्षिका म्हणून काम केले होते. त्या सेवानिवृत्त होत्या. पती जॉन हे पॅरेलेसिसच्या आजाराने अंथरुणास खिळून होते. त्यामुळे वेरोनिका या गेली अडीच वर्षे जॉन यांच्यावर उपचार व सेवा करत होत्या. 25 एप्रिलला दुपारी दीडच्या सुमारास वेरोनिका यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
डायस यांची मुले रॉजर व नेव्हील, विवाहित मुली स्विडल आणि प्रिंसिया, जावई आणि काही मोजक्या नातलगांनी एकत्रित येत रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अंत्यसंस्कार केले. ही आदरांजलीची प्रार्थना घरातच सुरु होती. त्यादरम्यान, बाजूच्या रूममध्ये असलेले जॉन डायस यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांनीही पत्नी पाठोपाठ जगाचा निरोप घेतला. त्यामुळे पुन्हा कुटुंबातील सदस्यांनी रात्री साडेआठ वाजता जॉन यांच्यावर अंत्यसंस्कार केले.