अंकारा : बहुजननामा ऑनलाइन – पत्नीच्या गरोदरपणात काळजी घेणारे अनेक पती आपण पाहिले असतील. पण तुर्कीतील एका पतीने मोठे दुष्कृत्य केले आहे. या पतीने त्याच्या गर्भवती पत्नीसह सेल्फी काढला आणि सेल्फी काढल्यानंतर लगेचच तिला तब्बल 1000 फूट उंचीवरून खाली ढकलून दिले. यामध्ये सात महिन्यांच्या गरोदर महिलेचा मृत्यू झाला.
40 वर्षीय हकान आयसल आणि 32 वर्षांची सेमरा आयसल हे दोघे पती-पती तुर्की शहरातील मुगला येथे सुटी साजरी करण्यासाठी गेले होते. आयसल हे जोडपे बटरफ्लाय व्हॅली जवळच्या 1000 फूट उंच डोंगराजवळ गेले होते. जेव्हा या दोघांनी सेल्फी घेतला त्यानंतर हकान याने पत्नी सेमरा हिला उंचीवरून खाली ढकलले.
हा पूर्वनियोजत कट
याबाबत अभियोक्ताने दावा केला, की हकान याने पत्नीच्या हत्येचा कट रचला होता. हा एक पूर्वनियोजित कट होता. त्याने पत्नी सेमरा हिचा एक्सिडेंटल इन्शुरन्स काढला होता. हा इन्शुरन्स सुमारे 40 हजार पाउंडचा होता. या घटनेनंतर हकान याने या रकमेसाठी क्लेमही केला होता. पण विमा कंपनीने हा क्लेम फेटाळून लावला. आता या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
हकानने फेटाळले आरोप
सेमरा हिचा पती हकानने पत्नीला ढकलले नाही आणि मी तिचा खून केला नाही, असे वारंवार सांगत होता. फोटो काढल्यानंतर तिने फोन पुन्हा बॅगेत ठेवला होता. त्यानंतर माझ्याकडे फोन मागितला. मी उठत होतो, बॅगेतून फोन काढला तेव्हा मला पत्नीचा ओरडण्याचा आवाज आला. मी माझ्या पत्नीला ढकलले नाही.