बंगालच्या उपसागरात ‘बुरेवी’ चक्रीवादळ ! तामिळनाडु, केरळमध्ये अलर्ट जारी

Alert issued in Tamil Nadu

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात ‘बुरेवी’ हे चक्रीवादळ निर्माण झाले असून ते ताशी ६ किमी वेगाने भारतीय किनार्‍याच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. त्यामुळे तामिळनाडु, केरळसह श्रीलंकेत अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात आलेल्या ‘निवार’ चक्रीवादळामुळे तामिळनाडु, पाँडेचरीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यापाठोपाठ आता ‘बुरेवी’ हे चक्रीवादळ आले आहे.

‘बुरेवी’ चक्रीवादळ सध्या कन्याकुमारीपासून ७०० किमी, तर श्रीलंकेतील त्रिकोमालीपासून ३०० किमी दूर आहे. हे चक्रीवादळ उद्या सकाळी श्रीलंकेच्या किनार्‍यावर धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा परिणाम आणखी दोन दिवस जाणवणार आहे. दक्षिण आंध्र प्रदेशची किनारपट्टी, तामिळनाडु, कन्याकुमारी, दक्षिण केरळ या संपूर्ण परिसरात जोरदार पावसाची शक्यता असून उद्या ३ डिसेंबर रोजी दक्षिण तामिळनाडु आणि दक्षिण केरळामधील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

या चक्रीवादळाला महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, पुढील दोन दिवस आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर डिसेंबर महिना असूनही राज्यात पुढील काही दिवस हुडहुडी भरविणारी थंडी असणार नाही.