मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांची गुजरात स्थित स्टर्लिंग बायोटेकद्वारा कोट्यवधी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणासंदर्भात आतापर्यंत तीनदा पटेल यांना ईडीच्या कार्यालयात जावं लागलं आहे. यापूर्वी ईडीने २७ आणि ३० जूनला अहमद पटेल यांची पीएमएलए कायदा २००२ अंतर्गत चौकशी केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडोदरा स्थित फार्मास्युटिकल फार्मचे मालक आणि प्रमोटर्सचे संदेसरा ब्रदर्स (चेतन जयंतीलाल संदेसरा, नितीन संदेसरा) यांच्याबरोबरचे असलेले पटेल यांचे संबंध जाणून घ्यायचे आहेत. या प्रकणाबाबत २०१९ साली अहमद पटेल यांचे चिरंजीव फैसल पटेल यांची चौकशी करण्यात आली. पण आता या प्रकरणात काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उडी घेत नवीन माहिती समोर आणली आहे. स्टर्लिंग बायोटेक बाबत दिल्लीतील चौकशी झाली असेल तर ईडीने मुंबईकडे आपलं लक्ष केंद्रित करावं. स्टर्लिंग बायोटेकचे संचालक राजभूषण दीक्षित आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या व्यवहारातून अनेक प्रश्नांची उत्तरे ईडीला मिळू शकतील. राजभूषण दीक्षित यांना १० हजार स्क्वेअर फूट मात्रोश्री २ साठी केवळ ५.८ कोटी रुपये मिळाले असून बीकेसीसारख्या परिसरात ही जागा आहे. तसेच मुंबईच्या बाजारभावापेक्षा अत्यंत कमी पैशात या संपत्तीची खरेदी झाली आहे. खरेदी करताना चेक पेमेंटशिवाय मोठ्या प्रमाणात रोखीने व्यवहार करण्यात आला असल्याचा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.
राजभूषण दीक्षित हे अटकेत आहेत. ईडीने आपल्या चौकशीत राजभूषण दीक्षित आणि त्यांचा भाऊ यांच्यासोबत झालेल्या मालमत्ता व्यवहाराची चौकशीचीही गरज आहे. अशी मागणी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी करत थेट मुख्यमंत्री यांना संशयाच्या जाळ्यात ओढलं आहे. ऑक्टोबर २०१६ मध्ये उद्धव ठाकरेंनी कलानगर परिसरात मातोश्री २ साठी जमीन खरेदी केली होती. त्यावरुन आता संजय निरुपम यांनी या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.
काय आहे मातोश्री २ जागा खरेदी प्रकरण?
वांद्रे कलानगर परिसरात कलाकार के के हेब्बर राहत होते, १९९९ मध्ये हेब्बर यांच्या निधनानंतर ही जागा त्यांच्या पत्नीच्या नावावर झाली. ती वारसा हक्काने मुलांकडे आली. २००७ मध्ये हेब्बर यांच्या मुलांनी मालाड येथील प्लॅनेटियम इन्फ्रास्ट्रक्चरला ही जागा ३.५ कोटींमध्ये विकली. त्यानंतर प्लॅनेटियमचे मालक राजभूषण आणि जगभूषण यांनी या जागी ८ माजली इमारत बांधण्याची परवानगी घेतली. पण कालांतराने ही जमीन ठाकरे कुटुंबीयांनी ५.८ कोटींना प्लॅनेटियम कंपनीकडून विकत घेतली.
स्टर्लिंग बायोटेक प्रकरण काय आहे ?
गुजरात स्थित बायोटेक लिमिटेडद्वारा संदेसरा ब्रदर्स चेतन आणि नितीन यांनी बँकेसोबत १४ हजार ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्यानंतर या दोघांनी देश सोडून पळून गेले. व्यवसाय वाढवण्याचा माध्यमातून संदेसरा स्टर्लिंग बायोटेकच्या नावावर ५ हजार ३८३ कोटींचे कर्ज घेतले. हे कर्ज आंध्रा बँकेच्या माध्यमातून घेतले गेले, पण जाणूनबुजून त्याची परतफेड करण्यात आली नाही. बँकेने २०१७ मध्ये फार्मा प्रमोटर नितीन, चेतन आणि दीप्ती संदेसरा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तर ईडीच्या चौकशीत स्टर्लिंग बायोटेकने बँकाकडून कर्ज घेण्यासाठी आपल्या प्रमुख कंपन्यांच्या बॅलेन्स सीटच्या आकड्यात फेरफार केल्याचं उघड झालं होत.