पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पोलीस जनतेशी कशा प्रकारे वागतात .त्यांना उत्तम सेवा देतात का? हे जाणून घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील(Dilip Walse Patil) यांनी एका व्यक्तीला फोन लावला. त्याच्याकडूनच पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा अनुभव कसा होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीने पोलिसांचे काम उत्तम असल्याची पावती दिली. पण गृहमंत्र्यांनी ज्या व्यक्तीला फोन लावला होता तो निघाला राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता. यावर तुमचे पद सांगितल्यामुळे तुम्हाला पोलिसांकडून चांगली वागणूक दिली का? अशी मिश्किल टिप्पणी गृहमंत्र्यांनी केली.
पुण्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कशी आहे हे जाणून घेण्याबरोबरच त्याविषयी चर्चा करण्यासाठी गृहमंत्री वळसे पाटील शुक्रवारी आयुक्तालयात आले होते. यावेळी त्यांनी पुणे पोलिसांचे काम जाणून घेण्यासाठी काही विभागांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे आदी उपस्थित होते. सेवाप्रणाली कार्यालयातील समन्वय कर्मचारी पूजा भगत यांनी एका अर्जदाराला फोन केला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आपल्याशी बोलणार असल्याची माहिती त्यांनी अर्जदाराला दिली. एखाद्या व्यक्तीने पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधल्यानंतर त्यांना योग्य ती सेवा अन् मदत दिली जाते का? ते समाधानी आहेत का? याची तपासणी करण्यासाठी वळसे पाटीलांनी एका व्यक्तीला फोन लावला. रमेश राऊत असे त्यांचे नाव होते. पोलीस व्हेरीफिकेशसाठी मुंढवा पोलीस ठाण्यात गेलो होतो. पोलिसांनी खूप चांगली सेवा दिल्याचे त्यांनी सांगताच तुमचे पद बघून चांगली वागणूक दिली का? अशी विचारणा करताच कार्यकर्ता हसला.