पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – आलिशान मोटारी चोरणाऱ्या सराईतत गुन्हेगारास हिंजवडी पोलिसांनी गोव्यातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची फॉर्च्युनर मोटार गाडी हस्तगत केली आहे. वसिम कासीम सय्यद (32, रा. गुगल, हाऊसिंग सोसायटी, मडगाव, गोवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास हिंजवडी येथून एका चोराने फॉर्च्युनर चोरून नेल्याचा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहिती आरोपीचा माहिती काढली. हिंजवडी पोलिसांचे तपास पथक थेट गोव्यात पोहोचले. सलग 3 दिवस ठेवून गोव्यात राहून आरोपीचा ठावठिकाणा काढला. गोव्यासह, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून आलिशान कार चोरी करणाऱ्या वसिम कासिम याला हिंजवडी अटक केली.
या प्रकरणी विकास दारासिंग परदेशी यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती व फिर्यादी विकास बावधन येथील कोठारी टोयोटा सर्व्हिस सेंटर येथे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात.२१ नोव्हेंबर रोजी त्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व्हिसिंगसाठी आलेली फॉर्च्युनर कार सर्व्हिसिंग करून तयार झाली. त्यानंतर ग्राहकाच्या घरी सोडण्यासाठी डिलिव्हरी बॉय विकासने कार सर्व्हिस सेंटरच्या बाहेर काढली. सर्व्हिस सेंटर ते मधुबन हॉटेल हिंजवडी या दरम्यानच्या रस्त्यावर आरोपी वसिम याने विकासला गाठले.‘ये हमारे कंपनी की गाडी है. मै लेने आया हूँ. आप ड्रॉप करने जा रहे है क्या?’ असे म्हणून सर्व्हिसिंगचे सात हजार रुपये रोख देत वसिम याने विकासचा विश्वास संपादन केला. काही अंतर गेल्यानंतर वसिम याने कार ताब्यात घेतली आणि धूम ठोकली.
कार मालकाला कार पोहोचली नाही, त्यामुळे कार मालकाने सर्व्हिसिंग सेंटरकडे चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. आरोपीने यापूर्वी गोवा राज्यात तीन, कर्नाटक येथे एक असे एकूण चार आलिशान कार चोरीचे गुन्हे केले आहेत. आलिशान कार चोरून तो विकत असे. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत मोहिते, वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख अनिरुद्ध गिजे, एम डी वरुडे, सहाय्यक फौजदार वायबसे, पोलीस कर्मचारी बाळू शिंदे, किरण पवार, नितीन पराळे, आतिक शेख, कुणाल शिंदे, विवेक गायकवाड, सुभाष गुरव, अमर राणे, झनकसिंग गुमलाडू, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, विकी कदम, अली शेख, रितेश कोळी, आकाश पांढरे यांच्या पथकाने केली.
Visit : bahujannama.com